नगर : पुढारी वृत्तसेवा : मघा नक्षत्राने शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पावसाची नोंद झाली. तीन महिन्यांत पहिल्यांदाच सरासरी 40.3 मि.मी. पाऊस झाला. श्रीरामपूर, अकोले, राहाता, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, नेवासा या तालुक्यांना पावसाने झोडपून काढत दाणादाण उडवून दिली. श्रीरामपूर, अकोले व राहाता या तीन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवडाभरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, ओढे वाहू लागले. त्यानंतर मघा नक्षत्र लागले. या नक्षत्रात जोरदार पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. परंतु या नक्षत्राने अकोले वगळता दुसरीकडे पाठ फिरवली होती. हे नक्षत्र यंदा कोरडेठाक जाणार असे वाटत असतानाच शेवटच्या दिवशी बुधवारी रात्री मघा नक्षत्राने रुद्र अवतार धारण केला. श्रीरामपूर, अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांत ढगांच्या गडगडाटात व वीजाच्या लखलखाटात धुवाँधार पाऊस झाला. शेवगाव तालका वगळता उर्वरित तेरा तालुक्यात सरासरी 18 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
पंधरा ते वीस दिवसांनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री सरासरी 40.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. तीन महिन्यांत पहिल्याच सर्वाधिक पावसाची नोंद झाली.श्रीरामपूर, राहाता, अकोले, राहुरी, श्रीगोंदा, पारनेर आदी तालुक्यांतील धुवाँधार पावसाने गावागावांतील ओढे, नाले वाहिले. त्यामुळे सखल भागाला तळ्यांचे स्वरुप आले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
नदीकाठच्या जनतेने सतर्कता बाळगावी
जिल्ह्यात आतापर्यंत 384.1 मि.मी. म्हणजे 85 टक्के पाऊस झाला. तीन दिवस पाऊस झाल्यास धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन, नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले.
तालुकानिहाय 24 तासांचा पाऊस
नगर 20.8, पारनेर 42.7, श्रीगोंदा 40.2, कर्जत 21.2, जामखेड 19.7, शेवगाव 7.3, पाथर्डी 18.2, नेवासा 28.4, राहुरी 27.5, संगमनेर 58.9, अकोले 79.2, कोपरगाव 63.2, श्रीरामपूर 81.8, राहाता 69.7.
21 महसूल मंडलांत अतिवृष्टी (मि.मी.)
टाकळीभान 158, नेवासा बु. 158, साकूर 115.8, पोहेगाव 109.3, पारनेर 66.3, टाकळी 74, पेडगाव 71.8, धांदरफळ 89.5, वीरगाव 102.3, समशेरपूर 78.3, साकीरवाडी 81, राजूर 65, शेंडी 65, कोतूळ 78.8, ब्राम्हणवाडा 75.8, सुरेगाव 83, श्रीरामपूर 69.5, राहाता 65, शिर्डी 80.3, लोणी 69.8, बाभळेश्वर 91.8.65र्.ें