नगर : ‘स्वाईन फ्लू’बाधितांचा जिल्ह्यात वाढला आकडा, आतापर्यंत 26 बाधित | पुढारी

नगर : ‘स्वाईन फ्लू’बाधितांचा जिल्ह्यात वाढला आकडा, आतापर्यंत 26 बाधित

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संकट काहीसे दूर होताच आता ‘स्वाईन फ्लू’ने जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. जिल्हाभरात गत 20 दिवसांत स्वाईन फ्लूचे 25 बाधित आढळले असून, त्यातील 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारी आरोग्य विभागाने संशयितांच्या घेतलेल्या 448 चाचण्यांमध्ये संगमनेर तालुक्यातील कासारवाडीत आणखी एक बाधित आढळला आहे. सध्या स्वाईन फ्लू आजाराच्या भितीने नागरीकांच्या मनात घबराट पसरली आहे. स्वाईन फ्लू हा श्वसनास अडथळा निर्माण करणारा आजार आहे.

खोकला, सर्दी किंवा स्वाईन फ्लूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना हात लावला तरी, हा आजार होण्याचा धोका असतो. नाक, डोळे, तोंडावाटे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. कोरोनाप्रमाणेच या आजाराचेही लक्षणे असल्याचे सांगितले जाते. आरोग्य विभागाकडून याविषयी जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेेण्यात आल्या आहेत.

बाधितांचा आकडा पोहचला 26 वर

जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 17 बाधित आढळले आहेत. त्याखालोखाल कोपरगाव, पारनेर, राहाता आणि नगर तालुक्यातही स्वाईन फ्लूचे बाधित सापडले आहेत. गुरुवारी (दि.1 सप्टेंबर) अखेरीस बाधितांचा आकडा हा 26 पर्यंत पोहचला आहे.

18 दिवसांत आठ मृत्यू
जिल्ह्यात 26 बाधित आढळले असून, यात 10 ते 28 ऑगस्ट या 18 दिवसांच्या कालावधीत 8 मृत्यू झाले आहेत. पहिला मृत्यू हा 10 ऑगस्ट रोजी झाला होता. तर शेवटचा आठव्या रुग्णाचा मृत्यू 28 ऑगस्ट रोजी झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

दररोज 400 हून अधिक चाचण्या!
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी संशयीत रुग्णांच्या चाचण्यांना वेग दिला आहे. आतापर्यंत 15 दिवसांत साधारणतः 48 हजार 575 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच बुधवारी दिवसभरात 448 चाचण्या केल्या असून, त्यात एक बाधित आढळला आहे.

तालुका निहाय बाधित (कंसात मृत्यू)
नगर : 1 (1)
संगमनेर : 17 (3)
कोपरगाव : 4 (3)
पारनेर : 3 (1)
राहाता : 1 (0)

Back to top button