राहुरी : मुळा धरणाचे अकरा दरवाजे पुन्हा उघडले | पुढारी

राहुरी : मुळा धरणाचे अकरा दरवाजे पुन्हा उघडले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा पाणलोट क्षेत्रावर पावसाने थांबा घेतल्यानंतर आवक घटली होती. पाच दिवसांपूर्वी दरवाजे बंद करण्यात आले होते. दरम्यान, गणरायाचे आगमन होताच पावसानेही पाणलोट व लाभक्षेत्रात जोरदार धडक दिल्याने मुळाचे सर्व 11 दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहे. दरवाज्यातून काल (दि. 1 ) रोजी सायंकाळी 5 वाजता 2 हजार 170 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. मुळा धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. नविन आवकेचे पाणी सांडव्यासह डावा व उजवा कालव्याद्वारे सोडले जात होते. मुळा धरणातून 14 ते 27 ऑगस्ट या 14 दिवसाच्या कालावधीत 4 हजार 316 दलघफू इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले होते. आवक अत्यल्प झाल्याने धरणाचा दरवाजातून विसर्ग बंद करण्यात आला होता.

शेती सिंचन व तलाव भरण्यासाठी उजवा कालवा हा 1 हजार 300 क्यूसेक तर डावा कालवा 80 क्यूसेकने वाहत असताना आवकेत वाढ झाल्याचे दिसले. गुरूवारी सकाळच्या सत्रामध्ये 6 हजार क्यूसेकने धरणाकडे आवक होत असताना पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सायंकाळच्या सत्रामध्ये 2 हजार 700 क्यूसेकने नविन पाण्याची आवक कमी झाली, परंतु पावसाचे वातावरण पाहता दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुन्हा जायकवाडीच्या दिशेने मुळा नदीपात्र दुथडी भरून वाहू लागली आहे.

सायंकाळी धरणसाठा 25 हजार 700 दलघफू इतका नोंदविण्यात आला होता. धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. गणरायाच्या आगमनासह पावसाने पुन्हा मुळाचे लाक्ष क्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर धडक दिली आहे. बाप्पाच्या कृपेने धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये वक्रांगी सर्व 11 दरवाजाची चाके वर उचलत पाणी सोडण्यात आले आहे. मुळा पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाने आठवड्यांनंतर पुन्हा धो- धो सुरू आहे. कोतूळ पट्ट्यामध्ये 88 मि. मी. पावसाची नोंद झाली.

पायथ्याशी राहणार्‍या शेतकर्‍यांना पास अनिवार्य
मुळा धरणाच्या पायथ्याशी राहणार्‍या बारागाव नांदूर येथील शेतकर्‍यांना दरवाजावरून ये- जा करावी लागते. पाटबंधारे विभागाने पास असल्याशिवाय कोणालाही ये- जा करण्यास बंदी घातली आहे. पास असणार्‍यांना दरवाज्यावरून ये- जा करता येणार असल्याचे सांगितले.

25 हजार 700 दलघफू साठा स्थिर राखणार
मुळा धरणाचा साठा 25 हजार 700 दलघफू (99 टक्के) स्थिर राखत उर्वरीत आवकेचे पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे. धरणातून दरवाजासह डावा व उजव्या कालव्याद्वारे 3 हजार 450 क्यूसेकने एकूण विसर्ग सोडण्यात आला आहे. सकाळी 6 हजार क्यूसेकने वाढलेली आवक सायंकाळी 2 हजार 700 क्यूसेक इतकी कमी झाली, परंतु पावसाचा अंदाज पाहता विसर्ग सुरूच ठेवणार असल्याचे उपअभियंता शरद कांबळे यांनी सांगितले.

Back to top button