नगर : नऊ तालुक्यांत लंपीचा हाहाकार, 76 जनावरांना बाधा | पुढारी

नगर : नऊ तालुक्यांत लंपीचा हाहाकार, 76 जनावरांना बाधा

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शिरकाव केलेला लंपी रोग आता दिवसेंदिवस हातपाय पसरू लागला आहे. अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, कर्जत, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा आणि पाथर्डी अशा नऊ तालुक्यांत आतापर्यंत तब्बल 76 जनावरांना लंपीची बाधा झाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने ‘गोट फॉक्स’ नावाच्या लसीचे 30 हजार डोस खरेदी केले असून, पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाला वेग दिल्याचे पहायला मिळत आहे.

जनावरांच्या अंगावर पुरळ येणे, ताप असणे, चारा न खाणे, गाठी दिसणे, इत्यादी लंपी या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. आतापर्यंत 76 जनावरांना लंपीची बाधा झाली आहे. यामध्ये गायी, म्हशी अशा जनावरांचा समावेश आहे. या आजारामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसादसिंग, उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर आदींनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ज्या भागात जनावरे आढळली आहेत, त्या भागाच्या पाच किलोमीटर अंतरावर लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश काढले आहेत. सीईओ आशिष येरेकर यांनी तातडीने 30 हजार ‘गोट फॉक्स’ डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरणात खंड पडणार नाही, अशी माहिती पशुसंवर्धनचे डॉ. संजय कुमकर यांनी दिली.

घाटशिरस येथे लंपीसदृश आजाराचे थैमान

घाटशिरस येथे जनावरांमध्ये लंपीसदृश आजारानेे डोकेवर काढले आहे. गावातील इतर जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी गावामध्ये प्रतिबंधात्मक फवारणी करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाने दिल्या आहेत. ज्या गाई-म्हशीला लंपी सदृश आजाराची लक्षणे आढळून आली आहेत, त्यासंबंधीचे रिपोर्ट पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती तिसगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा झावरे यांनी दिली.

बुधवारी (दि.31) घाटशिरस येथील एका शेतकर्‍याची गाय व म्हैस लंपी सदृश आजाराने आजारी असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्यानंतर, रक्ताचे नमुने पशुरोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविण्यात आलेले असून, त्याचा अहवाल 2 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.गावातही डास व गोमाश्या प्रतिबंधक फवारणी करणार असून, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात लसीकरण मोहीम हाती घेण्याची मागणी सरपंच गणेश पालवे यांनी केली आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेने 30 हजार डोस खरेदी केले आहे. त्यामुळे लसीकरणाला आणखी वेग येणार आहे. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, जनावरांमध्ये ताप, चारा न खाणे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क करावा.
                                                        – डॉ. सुनील तुंबारे उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

Back to top button