मढी : मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन उत्साहात, मायंबाला भाविकांची मांदियाळी | पुढारी

मढी : मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन उत्साहात, मायंबाला भाविकांची मांदियाळी

मढी : पुढारी वृत्तसेवा : नाथ सांप्रदायाचे आद्य चैतन्य मच्छिंद्रनाथांनी ऋषिपंचमी दिवशी अवतार घेतला. त्यांची संजीवन समाधी असलेल्या मायंबा येथे मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देवस्थान समिती व भाविकांच्या उपस्थितीत मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी व मूर्तीची पहाटे महापूजा होऊन जन्मोत्सवास प्रारंभ झाला. पैठण वरून आणलेल्या गंगाजलाने मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीवर जलाभिषेक करण्यात येऊन नवनाथ ग्रंथातील अवतार प्रकट होण्याच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले.

यावेळी अशोक महाराज मरकड, देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, युवा नेते जयदत्त धस, सचिव बाबासाहेब म्हस्के, विश्वस्त रमेश ताठे, अनिल म्हस्के ,देवस्थानचे उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के ,सरपंच राजेंद्र म्हस्के, अर्जुन म्हस्के, भरत भगत, नवनाथ म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्याची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. पुणे, नाशिक, बारामती, नगर विभागातून मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते. स्थानिक महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी जन्माचा पाळण्याचे गायन करात विविध मान्यवरांच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला. शेंडगेवाडी, सावरगाव येथील भजनी मंडळाच्या उपस्थितीत नाथांच्या अश्वाची आवारातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मंदिराचा गाभारा, सभामंडप, तसेच सर्वच ठिकाणी विविध रंगांच्या आकर्षक फुले, फळे व फुग्यानी वैशिष्ट्यपूर्ण केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. भाविकांच्या गर्दीमुळे मायंबावर वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती.

ऋषिपंचमीला नाथभक्तांची होते गर्दी
नाथ व वारकरी सांप्रदायाचे प्रमुख पीठ म्हणून मायंबाची ख्याती आहे. नाथभक्त ऋषिपंचमीला मत्सेद्रनाथांना गुरुस्थानी मानून विविध प्रकारे पूजा करतात. समाधीवर अत्तर शिंपडणे, नाडा अर्पण करणे महाप्रसादाची सेवा भाविकाकडून केली जाते. जालिंदर झिजुर्के यांनी व शिवगोरक्ष नाथयोगी आस्थाना चितेगाव यांच्या महाप्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात आले.

Back to top button