

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा शहराजवळ चारचाकी वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. नेवासा पोलिस ठाण्यात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ काशीनाथ लष्करे (वय 49) हे स्वातंत्र्य दिनी सकाळी 9 च्या दरम्यान शहराजवळील बालाजी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकून नेवासा फाट्याकडे जात होते. त्यावेळी दगडी पुलाजवळ समोरून चुकीच्या मार्गाने येणार्या चारचाकी वाहनाने (क्र.एमएच 14 डीए 5811) जोरदार धडक दिली.
या अपघातात लष्करे यांच्या डोक्याला, हाताला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नेवासा फाट्यावरील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. औरंगाबादमधील दवाखान्यातही लष्करे यांची विविध तपासण्या करण्यात आल्या. या प्रकरणी लष्करे यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी चारचाकी वाहनांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तुळशीराम गिते तपास करीत आहेत. अद्याप चालकास अटक करण्यात आलेली नाही.