करंजी दरोड्यातील फरार गजाआड रेल्वेस्थानक परिसरातून घेतले ताब्यात | पुढारी

करंजी दरोड्यातील फरार गजाआड रेल्वेस्थानक परिसरातून घेतले ताब्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. नगर रेल्वेस्थानक परिसरातून आरोपीला पोलिसांनी अटक केली. अश्पाक वैभव काळे (रा. पांगरमल, ता. नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे घडलेल्या दरोडा व खुनाच्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच गुन्ह्यातील एक आरोपी फरार होता.

फिर्यादी शांताबाई गोपीनाथ भावले (वय 65, रा. अपूर्वा पेट्रोलपंपासमोर, करंजी, ता. पाथर्डी) यांच्या घरात प्रवेश करत मारहाण करून 0 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. शांताबाई यांचे पती गोपीनाथ लक्ष्मण भावले यांना हत्याराने मारहाण करून जखमी केले होते. जखमी गोपीनाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील 3 आरोपींना पोलिसांनी पूर्वीच अटक केली होती. मात्र, अश्पाक काळे हा घटनेनंतर फरार होता. दरम्यान, आरोपी अश्पाक काळे हा रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍याकडून मिळाली. कटके यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी अश्पाक काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर आणि सातारा जिल्ह्यात खून, दरोडा, घरफोडी, चोरी व फसवणुकीचे 9 गुन्हे दाखल आहेत.

Back to top button