संगमनेर : घरे फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास | पुढारी

संगमनेर : घरे फोडून लाखोंचा ऐवज केला लंपास

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सर्वजण गणेशाच्या आगमनाची व जल्लोषाची तयारी करीत असताना चोरट्यांनी संगमनेर शहर आणि परिसरात धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोड्या करत लाखो रुपयांचा ऐवज लांपास केला.
गेल्या काही दिवसांमध्ये संगमनेरात व परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवसा-ढवळ्या लुटमार करत असताना रात्री बंद घरांना लक्ष्य करुन दरोडे टाकले जात आहेत. दरम्यान, नगर रोडवरील पंचायत समितीच्या जुन्या व नवीन इमारतीमधील कर्मचारी वसाहतीच्या बंद घरांना काल रात्री चोरट्यांनी लक्ष्य केले.

नवीन वसाहतीमधील मुख्य गेेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी वसाहतीत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी इतर घरांना बाहेरुन कडी लावली. त्यानंतर मधुकर रामचंद्र देवकर आणि विस्तार अधिकारी भाग्यश्री नरहरी शेळके यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातून 27 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, तर वंदना विक्रम नवले यांच्या घरातून 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. हे रहिवासी बाहेरगावी गेले असल्याने चोरट्यांनी ही संधी साधली. त्यानंतर चोरट्यांनी जुन्या इमारतीतील वसाहतीकडे आपला मोर्चा वळवला. याठिकाणी श्रीमती आहेर, दहिफळे, आंबरे यांची बंद असलेली घरे तोडून घरातील कपाटांची उचकापाचक करत किमती ऐवज लूटून नेला.

दुसरीकडे शिवाजीनगर, पावबाकी रोड येथील प्रसाद सुरेश सोनवणे यांची 70 हजार रुपये किंमतीची पांढर्‍या रंगाची होंडा अ‍ॅक्टिव्हा गाडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. शहरालगत असणार्‍या खांडगाव रोडवरील वैदुवाडी येथील मच्छिंद तायगा शिंदे यांची 40 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरोहोंडा कंपनीची मोटारसायकल चोरीस गेली आहे.

Back to top button