उक्कलगावच्या सरपंचाच्या घरी चोरी | पुढारी

उक्कलगावच्या सरपंचाच्या घरी चोरी

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर चोर्‍यांचे सत्र सुरूच असून मंगळवारी पहाटे तालुक्यातील उक्कलगाव-खंडाळा रोडवरील राहात असलेले उक्कलगावचे सरपंच नितीन आबासाहेब थोरात यांच्या घरी तेथील अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. उक्कलगाव-खंडाळा रोडवर असलेल्या सरपंच नितीन थोरात यांचा बंगला आहे. मंगळवारी पहाटे तीन ते सव्वा तीनच्या सुमारास त्यांच्या बंगल्याच्या खिडकीतून चोरट्यांनी रुमचे लॉक शिताफीने तोडून घरात प्रवेश केला. तेथेच खोलीत अभ्यास आटोपून त्यांची मुलगी झोपली होती.

चोरट्यांनी तिच्या गळ्याला चाकू लावून तिला गप्प करत धमकावले. चोरट्यांनी नितीन थोरात यांच्या आईची पेटी घेऊन पोबारा केला. त्यांच्या शेतात ही पेटी फोडण्यात आली. त्यातील ऐवज लांबवून पेटी जागेवरच टाकून चोरट्यांनी पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच रहात असलेल्या किशोर दत्तात्रय थोरात यांच्या घराकडे वळविला. नंतर एकलहरेतील माजी चेअरमन नूरमहंमद जहागीरदार यांच्या घरी मोर्चा वळविला. या ठिकाणी असलेली सुमारे 70 हजारांची शेतीची अवजारे चोरून नेली. या ठिकाणी कपाटाची उचकापाचक करत फाईल्स व कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकली.

तेथून तीन हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. जहागीरदार यांच्या शेजारीच राहत असलेले अशोक विठ्ठल थोरात यांच्या घरीही 11 हजार रुपयांचा ऐवज लंपास पोबारा केला. मागील काही दिवसांपूर्वीच अशोक भानुदास थोरात यांच्या वाकणवस्ती या ठिकाणीतील शेतीवरून एसटीपी पंप, मोटार व स्टॅण्डसह चोरून नेल्या आहेत. लक्ष्मण चिंधे यांच्या गाडीची बॅटरीही मुकुंद जगधने यांच्या बंगल्यासमोरून चोरीला गेली आहे.

ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची मागणी
चोरीच्या घटनांची व्याप्ती पहाता या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची गरजेचे असल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणाही अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्याची गरज आहेत. याप्रकरणी बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके, पोलिस नाईक गणेश भिंगारदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, याबाबताचा अधिक तपास सुरू आहे. चोरी करणारे चोरटे सराईत असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहेत.

Back to top button