जेऊरची ग्रामसुरक्षा यंत्रणा पडली बंद | पुढारी

जेऊरची ग्रामसुरक्षा यंत्रणा पडली बंद

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊरमध्ये मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा ग्रामपंचायतीने बिल अदा न केल्याने बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. जेऊर हे क्षेत्रफळ व लोकसंख्येने मोठे गाव आहे. चोहोबाजूंनी डोंगररांगा असून ग्रामस्थ वाड्या-वस्त्यांवर, तसेच डोंगराच्या कडेला शेतामध्ये अधिक प्रमाणात राहतात. आपत्कालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.

परंतु ग्रामपंचायतीने यंत्रणेचे बिल अदा केले नाही. त्यामुळे ही यंत्रणा बंद पडली. विशेष म्हणजे, ग्रामसुरक्षा यंत्रणेचे बिल अदा करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे तरतूद देखील आहे. ढगफुटीनंतर उद्भवलेली पूर परिस्थिती, बिबट्यांचा वावर, चोर्‍या, अशा प्रसंगी ग्रामस्थांना सतर्क करण्यास या यंत्रणेचा मोठा उपयोग झाला. केवळ एका कॉलवरून संपूर्ण गावाला माहिती मिळत होती. ग्रामपंचायत कार्यालयासही या यंत्रणेचा घरपट्टी, पाणीपट्टी वसुली व महत्त्वाचे संदेश देण्यासाठी उपयोग होत होता.

सध्या जेऊर परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतांमध्ये कामे सुरू असल्याने दिवसा चोर्‍यांचे प्रकार देखील घडत आहेत. रात्री पाळीव प्राण्यांच्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. रस्ता लूट, डिझेल चोरीचे प्रकार देखील घडत आहेत. गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा उपयोग होतो. पण गाव व ग्रामस्थांच्या हितासाठी असणारी ग्रामसुरक्षा यंत्रणाच बंद झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे बिल अदा करून तत्काळ ती कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Back to top button