संगमनेर : गणेशमूर्ती खरेदी करणार्‍यांना जीएसटीचा फटका | पुढारी

संगमनेर : गणेशमूर्ती खरेदी करणार्‍यांना जीएसटीचा फटका

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी गणपतींच्या मूर्तीला पाच टक्के जीएसटी आकारला जात होता. मात्र, यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करून तो 12 टक्के झाला आहे. त्याचा सर्व भुर्दंड आता गणेशभक्तांवर पडणार आहे. आता महागड्या किमतीने गणेश भक्तांना गणेशमूर्ती खरेदी कराव्या लागणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवावर जीएसटी वाढत्या महागाईचे सावट असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खर्‍या अर्थाने गणेश मूर्तिकार गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू करत असतात. जुलै महिन्यामध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात मारण्याचे काम सुरू होत असते.

अन संपूर्ण मूर्ती बनवून तयार झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यांपासून गणपतीला रंगकाम करण्याचे काम सुरू केले जाते, तसेच गणेशोत्सवाच्या अगोदर आठ दिवसांत गणेश मूर्ती तयार करून ग्राहकांना विक्रीसाठी शेवट स्टॉल थाटले असल्याचे कुंभार आळा परिसरातील अनेक गणेश मूर्तिकारांनी सांगितले. गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही शहरातील गणेश मूर्ती बनविण्याचा परिसर असणार्‍या कुंभार आळी या परिसरातील गणेश मूर्तिकारांनी पीओपीच्या तसेच शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती बनवून विक्रीसाठी दुकाने थाटले आहेत. मात्र, गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची फारशी गर्दी दिसत नसल्यामुळे भांडवल गुंतवून ठेवलेल्या गणेश मूर्तिकारांची चिंता वाढलेली आहे.

कोरोना महामारीमुळे मागील वर्षी सरकारने गणेशोत्सवास परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे आम्ही थोड्याच गणेश मूर्ती बनविलेल्या होत्या. मात्र, यावर्षी कोविडचे सावट कमी झाले असले, तरी शासनाने उशिराने परवानगी दिली असल्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती बनविण्यास मूर्तिकारांना वेळ मिळाला नाही. ज्या मूर्ती बनविलेल्या आहे त्या मूर्तींना ग्राहक शोधण्याची वेळ गणेश मूर्तीकारांवर आली आहे. यावर्षी 6 इंचांपासून ते 6 ते 7 फुटांपर्यंत गणेश मूर्ती बनविण्यात आलेल्या आहेत.

चालू वर्षी पीओपी बनवलेल्या गणेश मूर्ती व शाडू मातीच्या गणेशमूर्तंच्या किमतीमध्ये सरासरी 60 ते 70 टक्के वाढ झालेली आहे, तसेच मागील वर्षी गणपतीवर 5 टक्के जीएसटी आकारला गेला होता. परंतु यावर्षी त्यात डबल वाढ करून थेट 12 टक्के जीएसटी केला आहे. त्यामुळे या वाढत्या जीएसटीचा भार गणेश भक्तांवर पडणार आहे. हे मात्र तितकेच खरे आहे. मागील वर्षापेक्षा चालूवर्षी गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणार साहित्य महागले आहेत.

Back to top button