भंडारदर्‍यात पर्यटकांसह अधिकार्‍यांचीही मौज! | पुढारी

भंडारदर्‍यात पर्यटकांसह अधिकार्‍यांचीही मौज!

अकोले : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनस्थळ असलेले भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण परिसरात निसर्ग सान्निध्यात मौजमजा व आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात, हे सर्वश्रूत आहे. मात्र, नगर जिल्ह्यासह विविध ठिकाणांवरून शासकीय वाहनांमधून अधिकारी व कर्मचारी शासकीय दौर्‍याच्या नावाखाली भंडारदरा परिसरात येत असल्याने या अनोख्या ‘सेवे’बद्दल जागरुक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. विशेष असे की, या अधिकार्‍यांच्या दिमतीला अकोले तालुक्यातील पोलिसांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सज्ज असल्याचे वास्तव दिसत आहे.

अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदरा, निळवंडे धरण परिसरात पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पर्यटनस्थळे बंद राहिले. यंदा मात्र पर्यटनाला मोठी चालना मिळाली. नेकलेस, रंधा धबधबा, कोकणकडा, पांजरे फॉलकडे पर्यटक गर्दी करतात. शनिवार व रविवारी सलग सुट्टीसह इतर दिवशी अक्षरशः जत्रेचे स्वरूप आल्याचे चित्र दिसते.
कोल्हार-घोटी राजमार्गावर भंडारदरा, घाटघर परिसरात पर्यटकांच्या सुसाट गाड्यांची रेलचेल दिसत आहे. त्यातच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांनी लहान-मोठ्या अपघाताची शृंखला सुरुच आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button