45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अकोलेत धामधूम, उद्यापर्यंत अर्ज स्वीकारणार

45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची अकोलेत धामधूम, उद्यापर्यंत अर्ज स्वीकारणार
Published on
Updated on

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तब्बल 45 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असल्या तरी, राजूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मात्र माजी आ. वैभवराव पिचड व आ.डॉ. किरण लहामटे या दोन आजी-माजी आमदारांना उमेदवार शोधण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असल्याने उमेदवार देता का कोणी उमेदवार, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, तालुक्यात सुमारे 45 ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरु आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास बुधवारी (दि.24) सुरुवात झाली. 1 सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे. दि. 2 सप्टेंबर उमेदवारी अर्ज छाननी व 6 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. (दि.30) पर्यंत सरपंचपदासाठी 163 तर सदस्यपदासाठी 447 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, नुकतेच आ. डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणार्‍या मतदारसंघातील ग्रामपंचायतीस 26 लाख रूपये निधी दिला जाईल, अशी घोषणा केली. मागील वेळी अकोले मतदार संघात निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायतीला 25 लक्ष रूपये निधी दिला. आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूर गावची लोकसंख्या 10 हजार 46, तर 17 ग्रा. पं. सदस्य आहेत. गेल्या पंंचवार्षिकमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर ग्रामपंचायत निवडणूक होऊन सरपंचपदी हेमलताई पिचड, तर उपसंरपचपदी गोकुळ कानकाटे विजयी झाले होते.

कोविड कालावधीत राजूर ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. काही काळ प्रशासक होते. पण, होऊ घातलेल्या राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत 6 वार्डांकरिता 17 सदस्य रणांगणात आहेत. जनतेतून सरपंच निवड होणार आहे. 17 ग्रामपंचायत सदस्य उमेदवारी करिता बहुतांश माजी ग्रामपंचायत सदस्यांनी उमेदवारी स्वतःहून नाकारल्याने नव्या उमेदवारांचा शोध घेण्यास आजी-माजी आमदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अनुभवी व तरुण उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे दिसते. परिणामी बळजबरीचा राम-राम करीत नवख्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी नेते, पुढारी व कार्यकर्ते घोड्यावर बसविताना दिसत आहेत. राजूर ग्रामपंचायतीच्या काही माजी सदस्यांवर जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. मतदान मागायला आल्यावर त्यांना धडा शिकविणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान, मंगळवारपर्यंत राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत 16 उमेदवारांनी ग्रा.पं. सदस्य, तर फक्त 1 उमेदवाराने सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला.

गावोगाव रंगला निवडणुकांचा आखाडा..!
आंबितखिड, बाभुळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, जामगाव, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहडी, कोंदनी, लव्हाळी ओतूर, माळेगाव, मान्हेरे, मवेशी, म्हाळुगी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पळसुंदे, पांजरे, पिंपरकणे, राजूर, रणदखुर्द- बु., समशेरपूर, सांगवी, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेलद, शेणीत, शिरपुंजे बु., टाहाकरी, तळे, तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे व वारंघुशी या 45 गावांत निवडणूक आखाडा रंगला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news