नगर : शिक्षक बँकेची सुनावणी 12 सप्टेंबरला | पुढारी

नगर : शिक्षक बँकेची सुनावणी 12 सप्टेंबरला

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अगस्ती कारखान्यासोबतच शिक्षक बँक निवडणुकीसंदर्भात शिक्षक संघटनेनेही खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत. अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक स्थगिती उठवल्याने आता शिक्षक बँक निवडणुकीच्या निकालाकडे शिक्षकांचे डोळे लागले आहेत. 12 सप्टेंबरला औरंगाबाद खंडपीठात शिक्षक बँक निवडणुकीवर निकाल लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
शिक्षक बँकेसाठी 24 जुलै 2022 रोजी मतदान आणि दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार होती.

प्रचार रंगात असतानाच 15 जुलैला सहकार विभागाने अतिवृष्टीचे कारण देत सर्वच निवडणूका 30 सप्टेंबरपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षक बँकेची निवडणूक थांबली होती. निवडणूक घ्यावी यासाठी सत्ताधारी गुरुमाऊली गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी न्यायालयात धाव घेतली, तर ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, डॉ. संजय कळमकर यांनीही मंत्रीस्तरावर पाठपुरावा केला. तांबे गटाच्या याचिकेवर 4 ऑगस्टला खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने सरकारला फटकारत 12 सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 12 च्या सुनवणीकडे लक्ष लागले असतानाच अगस्ती कारखाना निवडणूक घेण्याबाबत न्यायालयाने आदेश पारीत केले. आता शिक्षक बँक निवडणुकीबाबत 12 तारखेला काय निकाल लागणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे.

Back to top button