नगर : चार दिवसांतून तरी पाणी द्या; मनियार यांनी टोचले ग्रामपंचायतीचे कान | पुढारी

नगर : चार दिवसांतून तरी पाणी द्या; मनियार यांनी टोचले ग्रामपंचायतीचे कान

करंजी, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली, तरी ग्रामपंचायत गावाला आठ दिवसांनीच पाणी देते. किमान चार दिवसाला तरी पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन करा, अशा शब्दांत माजी सभापती अ‍ॅड. मिर्झा मणियार यांनी सत्ताधार्‍यांचे कान टोचले.

अ‍ॅड. मनियार यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. करंजीत सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेमध्ये अनेक तरुणांनी विविध कामांकडे सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधले. गेल्या दोन महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळत नाही. लालबावटा चौकातील सुशोभिकरणाचा प्रश्न, भुयारी गटारीची दुरवस्था, याकडे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी लक्ष वेधले.

मारुती मंदिरासमोरील यसकर चावडी ग्रामपंचायतने समाजाला विश्वासात न घेता पाडली असली, तरी नव्याने येसकर चावडी बांधून देण्याची मागणी रिपाइंचे सतीश क्षेत्रे यांनी केली. देशी दारूचे दुकान गावाबाहेर दोन किलोमीटरवर घालवण्यासाठी मागील ग्रामसभेत अर्ज करण्यात आला होता. त्याचे काय झाले, याची विचारणा काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष राजू क्षेत्रे यांनी केली. प्राथमिक शाळा, मंगल कार्यालय परिसरात सीसीटीव्ही बसवावे, मंगल कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूने वृक्षारोपणाची मागणी पत्रकार विलास मुखेकर यांनी केली. घरकुल, वैयक्तिक लाभाच्या योजना, स्टेटलाईट, प्लॅस्टिक बंदी, माझी वसुंधरा, घनकचरा व्यवस्थापन याविषयी ग्रामसेवक रवीकुमार देशमुख यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.

या ग्रामसभेला ग्रामपंचायतचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका व काही प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लवकरच पाण्याची व्यवस्था

दोन वर्षांपूर्वीच तत्कालीन उपसरपंच दयाबाई क्षेत्रे यांनी दलित वस्ती जवळ स्वतंत्र पाण्याची साठवण टाकी व पाईपलाईन करण्याच्या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे मांडला होता. त्या कामाचा सातत्याने पाठपुरावा देखील केला. हे काम मार्गी लागल्यानंतर दलितवस्ती व उपळी वस्तीच्या रहिवाशांना लवकरच पूर्ण दाबाने पाणी मिळेल, असा विश्वास ज्येष्ठनेते भाऊसाहेब रतन क्षेत्रे यांनी व्यक्त केला.

Back to top button