नगर : कामरगावात नवीन एसटी बस सुरू करा | पुढारी

नगर : कामरगावात नवीन एसटी बस सुरू करा

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील कामरगाव येथील शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीस्कर एस.टी बस नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने नगरवरून सुटणारी नवीन बस सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली.

नगर- पुणे महामार्गावर लोकसंख्येने मोठे असलेल्या कामरगावसह, पिंपळगाव कौडा, भोरवाडी येथून सुमारे 60 ते 70 विद्यार्थी दररोज सुपा, पारनेरला उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात जातात. गावात सकाळी येणारी एस.टी बस सकाळी 7.15च्या सुमारास येते. ती पारनेरला जाणार्‍या विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे, त्या बसमध्ये एकाचवेळेस 30 ते 40 विद्यार्थी बसल्याने निम्मे विद्यार्थी खाली शिल्लक राहतात. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. अशा वाहनातून प्रवास करणे जोखमीचे वाटते. विद्यार्थिनींचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन मंडळाने नगरवरून सुटणारी एसटी बस कामरगावला 6.30च्या सुमारास येईल, याची व्यवस्था करावी. यामुळे सुपा व पारनेरकडे जाणार्‍या विद्यार्थी व अन्य प्रवाशांची सोय व्हावी, या आशयाचे लेखी निवेदन सरपंच तुकाराम कातोरे, सदस्य संदीप ढवळे, अ‍ॅड. प्रशांत साठे, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोटे, श्रीराम बॉईजचे अध्यक्ष शिवाभाऊ सोनवणे, बाबासाहेब पाडेकर यांनी पारनेर आगारचे वाहतूक निरीक्षक रावसाहेब कर्पे यांना दिले आहे. आठ दिवसांत नवीन एस.टी बस सुरू न झाल्यास विद्यार्थी व पालकांसोबत लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच तुकाराम कातोरे यांनी दिला.

Back to top button