नगर : पालावरून त्याचा जीवनाचा श्रीगणेशा! डॉक्टर, आशा सेविकांचे धाडस!! | पुढारी

नगर : पालावरून त्याचा जीवनाचा श्रीगणेशा! डॉक्टर, आशा सेविकांचे धाडस!!

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : बाहेर धो-धो पाऊस पडत होता…गावापासून दिड-दोन किलोमीटर अंतरावर असणार्‍या डोंबारी वस्तीवर महिलेला सुरू झाल्या प्रसूती वेदना…पतीने आशा सेविकेला फोनवरून माहिती दिली..आशा सेविकेने रुग्णवाहिकेला फोन केला; मात्र तिला येण्यास विलंब होणार असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाच्या पथकाने हालचाली केल्या अन् पावसात पालात तिची सुखरूप प्रसूती करण्यात आली. यावेळी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, पालावरच या बाळाने जीवनाचा श्रीगणेशा केला..! ही सुखद घटना नगर तालुक्यातील दहीगाव येथे घडली.

असं म्हटलं जातं, की प्रसूती म्हणजे महिलेचा दुसरा जन्म असतो. ही वेळ गरोदर महिलेसाठी अत्यंत कठीण आणि तेवढीच घातकही ठरू शकते. त्यामुळे प्रसूती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी होणं अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचे अनेक कारनामे आपण ऐकले आहेत. नगर तालुक्यातील टाकळी काझी आरोग्य केंद्रातील अधिकारी – कर्मचार्‍यांच्या गलथानपणामुळे एका गरीब महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसूती झाल्याची घटना महिना भरापूर्वी घडली होती. त्याच्या अगदी उलट अशी सुखद घटना दहिगावमध्ये पाहावयास मिळाली.

डोंबारी वस्तीत आनंदी आनंद

दहिगाव येथील गावापासून दीड- दोन किलोमीटर अंतरावर एक डोंबारी वस्ती आहे. तेथे राहत असलेल्या गरीब कुटुंबातील महिलेला सायंकाळी सहाच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिलेचा पती विकास वाघ यांनी मध्यरात्री गावातील आशा सेविका आशा जाधव यांना तातडीने संपर्क केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाहेर पाऊस चालु असताना देखील त्याचा विचार न करता पावसात भिजत आशा सेविका जाधव वस्तीवर पोहचल्या.

शिराढोण आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत यादव व आरोग्य सेविका मनीषा बनसोड यांना त्यांनी फोन करून माहिती दिली. तसेच, आपत्कालीन 108वर अ‍ॅम्बुलन्सला फोन केला; परंतु प्रसूती वेदना वाढलेल्या होत्या. त्यामुळे आशा जाधव यांनी घटनास्थळावरून महिलेच्या परिस्थीती बद्दल डॉ. यादव यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेची सुखरुप प्रसूती केली. तेवढ्या वेळात आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. यादव ही दहिगाव येथील डोंबारी वस्तीवर पोहचून बाळांची आणि आईची तपासणी करून बाळांची नाळ कापली. प्रसूतीच्या सर्व प्रकीया पार पाडल्या, तसेच प्रसूतीनंतरच्या काळजी बदल सविस्तर माहिती देण्यात आली. बाळाच्या लसिकरणबाबतीत माहिती दिली. आरोग्य विभागाचे सहकार्य पाहून त्या महिलेचा पती विकास व त्याच्या कुटुंबीयांना आभार व्यक्त करण्यासाठी शब्द ही सुचत नव्हते.

कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक

शिराढोण आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत यादव, आरोग्य सेविका मनीषा बनसोड, आशा सेविका आशा जाधव यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिलेच्या व तिच्या नवजात बाळाचे प्राण वाचल्याने त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोग्य सेवेत ज्या दिवशी दाखल झालो, त्या दिवसांपासून जनसेवेचे व्रत घेतलेले आहे. ते माझे कर्तव्य आहे. माझ्या कार्यक्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण माझे काम आहे. निष्ठा पूर्वक करत आलो. यामध्ये माझे सहकारी मला खुप मदत करतात. त्यामुळे मला ते शक्य होत आहे.

– डॉ. सूर्यकांत यादव, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र शिराढोण

Back to top button