नगर : पारनेर तालुक्यातील वाळू तस्करी बंद करणार | पुढारी

नगर : पारनेर तालुक्यातील वाळू तस्करी बंद करणार

पारनेर / जवळा, पुढारी वृत्तसेवा : मविआ सरकारच्या काळात तालुक्यात काहींजण आपणच मुख्यमंत्री असल्याच्या तोर्‍यात राहून, जनतेला फसविणार्‍यांचे धंदे करत होते. ते आता पूर्ण बंद करणार असून, पारनेर तालुक्यातील, तसेच जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू वाहतूक करून सरकारला लुबाडणार्‍यांंना वेसण घालणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

राळेगण थेरपाळ येथील सिद्धी लॉन्समध्ये एका भाजप कार्यकर्त्यांच्या खासगी कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ. विखे आले होते. खासदार डॉ. विखे म्हणाले, जनतेची दिशाभूल करून खोटी आश्वासने देत तालुक्यातील जनतेच्या डोळ्यांत अवाढव्य विकास कामाबाबत धूळफेक करणार्‍यांचे पितळ उघडे करून, त्यांचा खरा चेहरा लवकरच समाजासमोर आणू.

गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये पारनेर तालुक्यात आपणच मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावात राहून तालुक्यात व जिल्ह्यात राष्ट्रवादीने जो गैरकारभार केला, त्यांच्या फाईली लवकर जनतेसमोर उघड करणार आहे, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे जनतेला यातून कळणार की, खरे कोण आणि खोटे कोण? आज पारनेर जलसिंचन योजनेतून 40 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे, त्यामुळे त्याचे खोटे श्रेय घेऊ नये. तालुक्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण राष्ट्रवादीने केलेल्या गैरकारभाराचे वाचन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला ते घरपोच रेनशन कार्ड विना मोबदला मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Back to top button