जिल्ह्यात आणखी एक मंत्रिपद ! आमदार राम शिंदे यांची माहिती; स्वतःही इच्छुक | पुढारी

जिल्ह्यात आणखी एक मंत्रिपद ! आमदार राम शिंदे यांची माहिती; स्वतःही इच्छुक

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो. तसा मी देखील इच्छुक आहे. जिल्ह्यासाठी आणखी एक मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व नेतृत्वच काय तो निर्णय घेईल, असे मत माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. आमदार शिंदे सोमवारी कार्यकर्त्यांना घेऊन कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, थांबा आणि पहा. मी श्रद्धा आणि सबुरी पाळणारा माणूस आहे. प्रत्येक आमदाराला मंत्री व्हावेसे वाटते. त्यामुळे मी देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. मात्र, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा झाली. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी देखील होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद जवळपास निश्चित झाले होते. राजकीय क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या पदासाठी आपण चर्चेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ईडी चौकशी; सूडबुद्धीचा प्रश्नच नाही
जामखेड-कर्जत मतदारसंघातील अनेक गावांतील लोकांनी पाणंद रस्त्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. ईडी ही त्रयस्थ संस्था आहे. या संस्थेला चौकशीसारखे काही मुद्देे मिळाले असतील. त्यामुळेच पाणंद रस्त्यांच्या कामांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. यामध्ये सुडबुद्धीने चौकशी लावण्याचा प्रश्नच नाही, असा टोला त्यांनी आमदार रोहित पवार यांना लागावला.

पाणंद रस्त्यांची कामे करताना ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले नाही. जी कामे झाली, ती लोकांच्या उपयोगाची नाहीत. ज्यावेळी गावागावांतील कामांची चौकशी होईल, त्यावेळी भ्रष्टाचाराचे प्रकार पुढे येतील. या कामांत अपहार झाला नाही, तर मग घाबरता कशाला, असा सवाल देखील त्यांनी नाव न घेता आमदार पवार यांना केला.

Back to top button