

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगरमध्ये लष्कराच्या विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या आधारे कॉपी करताना दोन परीक्षार्थींना लष्करी अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन्ही उमेदवार हरियाणातील आहेत. यामध्ये रवी रमेश संधू (वय 22 जि. हिस्सार, हरियाणा) व पूजा सुरेंद्र जलंदरा (वय 22 जि. जिढप, हरियाणा) यांचा समावेश आहे.
भिंगार येथे लष्करात विविध पदांची भरती सुरू आहे. त्यासाठी लेखी परीक्षा रविवारी (दि. 28) सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाली. या परीक्षेत दोन्ही परिक्षार्थींनी ब्ल्यूटूथ, तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या मदतीने कॉपीचा प्रयत्न केला. ही बाब लष्करी अधिकार्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. याबाबत कर्नल एल. सी. कटोजा (रा. मिल्ट्री हॉस्पिटल) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.