नगर : चातुर्मासानिमित्त जन्म कल्याणक नाटिका | पुढारी

नगर : चातुर्मासानिमित्त जन्म कल्याणक नाटिका

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी शहरातील जैन स्थानकात पर्युषण पर्वच्या चातुर्मासानिमित्त श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक नाटिका सादर करण्यात आली. जैन साध्वी विनाबेन मेहता, सुरेखाबेन वृनवाल यांच्या अधिपत्याखाली पर्युषण पर्वच्या सोहळ्यात धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

जैन धर्मात चातुर्मास पर्वास अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंतगढसूत्र वांचना, प्रवचन, कल्पसूत्र वांचना, महामंगलपाठ, सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण, सामूहिक आलोयना व मंगलपाठ, असे धार्मिक कार्यक्रम जैन बांधव करतात. पर्वातील पुण्यार्जन अर्जित करण्याचा अत्यंत प्रभावित क्षण पर्युषण महापर्व या कालावधीत धर्म साधना आराधना जप-तप-दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः आठ दिवसांच्या पर्युषण पर्व काळात जैन बांधव जैन स्थानकात सामूहिक जैन धर्माची आराधना करतात.

जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेला सांगता होते. या कालावधीत जैन साधू-साध्वी एकाच ठिकाणी चार महिने राहून, धर्मआराधना आणि साधना करतात. जैन स्थानकात जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थंकर श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मावर आधारित नाटिका सादर करून उपस्थित जैन बाधंवाना भगवान महावीरांचे आचार, विचार, महती आणि कार्याची माहिती नाटिकेतून देण्यात आली.

नाटिकेत अजिंक्य कांकरिया, मोनाली कांकरिया, रोहन कर्नावट, दीपाली कर्नावट आदींनी भगवान महावीरांच्या माता-पित्याची वेशभूषा साकारली. प्रतिभा बहू मंडळ, कन्या मंडळ व जैन पाठ शाळेचे बाल विद्यार्थी सहभागी झाले होते. श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, सुनील गांधी, सुरेश कुचेरिया, सुभाष खाबिया, अशोक गांधी, संपतलाल गांधी, कचरदास सुराणा, संजय गुगळे, रायचंद गटागट, सुभाष भंडारी आदींसह जैन बांधव उपस्थित होते. जे जैन भाविक रोजच्या जीवनात काही बाबींचे पालन करू शकत नाहीत, ते सर्व या आठ दिवसांचे पर्युषण पर्व पाळतात.

Back to top button