नगर : समाजकंटकाकडून पिकांचे नुकसान | पुढारी

नगर : समाजकंटकाकडून पिकांचे नुकसान

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रूक गावामध्ये समाज कंटकाने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांवर विषारी औषध फवारणी करीत खरीपाचे लाखो रूपयांचे नुकसान केल्याची संतप्त घटना समोर आली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांचे नुकसान करणार्‍यावर कठोर करवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

24 ऑगस्ट 2022 रोजी रात्रीच्या सुमारास खडांबे बुद्रुक शिवारात शेतकरी भाऊसाहेब मोहन गायके, रघुनाथ मोहन गायके, राजेंद्र भाऊसाहेब काचोळे, प्रसाद आबासाहेब काचोळे. तसेच कांताबाई अरुण तोंडे यांच्या उभ्या कपाशी, टोमॅटो आदी पिकांवर अज्ञाताने अत्यंत विषारी अशी तणनाशक फवारणी केली. परिणामी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांनी माना टाकल्या. काही ठिकाणी पिके जळू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली.

अचानकपणे पिके जळू लागल्याचा प्रकार घडल्यानंतर काहींनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांकडे मदत मागितली. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने शेतकर्‍यांना डावलत, ‘हे काम आमचे नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जा,’ असा सल्ला मिळाला. त्यानुसार शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे दाद मागितली. परंतु, पाहणी न झाल्याने त्रस्त शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधत पंचनाम्याची मागणी केली आहे.

Back to top button