नगर : चोरट्यांचा हैदोस साडेतीन कोटींवर डल्ला..! | पुढारी

नगर : चोरट्यांचा हैदोस साडेतीन कोटींवर डल्ला..!

श्रीकांत राऊत :  नगर : दिवसा बंद घरे हेरायचे अन् रात्री घरफोडी करत किंमती ऐवजावर डल्लामारी करून पसार व्हायचे. घरफोड्या करणार्‍या टोळ्यांनी जिल्ह्यात हैदोस घातला असून पोलिसांना गुंगारा देऊन चोरटे पसार होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू पाहत आहे. गत 7 महिन्यात जिल्हाभरात 433 घरफोड्या करत चोरट्यांनी दागिने, रोकड असा सुमारे 3 कोटी 44 लाख 63 हजार 722 रूपयांचा लंपास केला आहे. यातील मोजक्याच घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली. जिल्ह्यात सर्वत्र काही महिन्यांपासून दिवसाढवळ्या राजरोसपणे चोर्‍या, घरफोड्या होत आहेत. पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेतले जात आहेत. मात्र, गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.

चोरटे शोधण्यात अन् घरफोड्या रोखण्यात अपयशी झालेल्या पोलिसांबद्दल आता नागरिकांत संतापाची भावना निर्माण होवू पाहत अहे. दिवसा हेरगिरी करायची अन् अंधार्‍या रात्री डल्लामारीचा डाव साधयाचा, चोरट्यांच्या या करामतीने पोलिसांच्या रात्र गस्तीवरही आता शंका उपस्थित होऊ पाहते आहे. पोलिसांची गस्तपथके करतात तरी काय ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी रोखण्याचे कार्य 32 पोलिस ठाण्यातून सुरू आहे. तरीही दिवसा होणार्‍या घरफोड्या, चोर्‍या काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोर्‍या, घरफोड्यातून लाखोंचा ऐवज चोरटे लंपास करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहर पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह
नगर शहरात गेल्या सात महिन्यांत तब्बल 66 घरफोड्या झाल्या आहेत. दिवसाढवळ्या होणार्‍या घरफोड्यांच्या घटनेने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहर पोलिसांच्या ‘रात्रगस्तीवर’ प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘मौजमस्ती’साठी घरफोड्या
प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक सुशिक्षित तरूण चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्यासाठी घरफोड्या करत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. घरफोड्यांच्या काही घटनांमध्ये ‘मौजमस्ती’साठी घरफोड्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

174 आरोपी जेरबंद
बदलत्या काळानुसार चोरटे आता ‘हायटेक’ झाले असल्याने आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. 433 घरफोड्यांतील उघड केलेल्या गुन्ह्यांत पोलिसांनी 174 आरोपींना जेरबंद केले आहे.

जानेवारी 2022 पासून तब्बल 433 घरफोडीचे गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद आहे. यातील केवळ 104 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. नगर शहरात झालेल्या 66 घरफोड्यांपैकी फक्त 13 गुन्हे उघड झाले आहेत.
सात महिन्यांत तब्बल 433 घरफोड्या

 

 

Back to top button