पुणतांबेनंतर शिंगवे शिवारात बंधार्‍याच्या प्लेटांची चोरी | पुढारी

पुणतांबेनंतर शिंगवे शिवारात बंधार्‍याच्या प्लेटांची चोरी

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : राहाता तालुका तालुक्यातील शिंगवे शिवारातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याच्या काढून ठेवलेल्या 22 लाख 76 हजार 640 रुपये किमतीच्या 408 लोखंडी प्लेटा चोरट्यांनी चोरुन नेल्या. जलसंपदाच्या शिर्डी सिंचन शाखेंतर्गत असलेल्या शिंगवे गावाचे शिवारात गोदावरी नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. या बंधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी लोखंडी प्लेटा टाकल्या आहेत. पावसाळा व नदीला पाणी असल्याने बंधार्‍याच्या एकूण 575 लोखंडी प्लेटा काढून बंधार्‍यापासून 300 फुट अंतरावर दक्षिणेस शिंगवेगावचे कोल्हापूरी बंधार्‍याजवळ मोकळ्या जागेत शिंगवे शिवारात काढून ठेवल्या होत्या.

25 ऑगस्ट रोजी जलसंपदा अधिकारी या प्लेटांची पाहणी करीत असताना त्यांना लोखंडी प्लेटा कमी आढळल्या. या प्लेटातील सरळ लोखंडी प्लेटा 288 व वक्र लोखंडी प्लेटा 120 अशा कमी आढळल्या. या लोखंडी प्लेटांचा शोध घेतला असता त्या अधिकार्‍यांना न मिळाल्याने चोरी गेल्याची खात्री पटली. या प्लेटा चोरट्याने चोरल्याने याप्रकरणी राहाता पोलिस ठाण्यात जलसंपदा विभागाचे सिंचन शाखा शिर्डीचे कालवा निरीक्षक संजय महादेव शिंदे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.

यातील 288 प्रत्येकी 105 किलो वजनाच्या सरळ लोखंडी प्लेटांची किंमत 19 लाख 16 हजार 640 रुपये आहे. 120 वक्र लोखंडी प्लेटा प्रत्येकी 120 किलो वजन किंमत 3 लाख 60 हजार रु. किंमत अशा एकूण 22 लाख 76 हजार 640 रुपयांच्या प्लेटा चोरट्यांनी चोरुन नेल्या. कालवा निरीक्षक शिंदे यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि. सुनील गायकवाड व पो. काँ. दिलीप मंडलिक करीत आहेत.

बंधार्‍यांच्या फळ्या चोरीचे मोठे रॅकेट ?
बंधार्‍यांच्या फळ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणतांबा येथील 300 फळ्या काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्या. यातील फळ्यांची वाहतूक करताना शेतकर्‍यांनी चोरटे रंगेहाथ पकडले. आता काही प्रमाणात रोख रक्कम देऊन तडजोड सुरू असल्याचे समजते, मात्र मुख्य सुत्रधार मोकाटच सुटणार असल्याची चर्चा शेतकर्‍यांत आहे. शिंगवे चोरीचा तपास तातडीने लावण्याची मागणी केली जात आहे.

 

 

Back to top button