नगर : 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

नगर : 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना संसर्ग आणि कामगारांचा संप, या दोन कारणांमुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. महामंडळाला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रवासासाठी एसटीलाच पसंती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी 850 बस होत्या. तर, आजमितीस 593 बस व 88 मालट्रक आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत आजमितीस 183 बस कमी आहेत. बसची कमतरता आणि आहे त्या बसचा दैनंदिन बिघाड, यामुळे सद्यस्थितीत लांब पल्ल्यांच्या बस व ग्रामीण भागात बससेवा पुरविताना मोठी अडचण येत आहे. अशा परिस्थितीत आजमितीस दररोज 1 लाख 75 हजार किलोमीटर बस धावत आहेत. हळूहळू जास्तीत जास्त बस सुरू करू. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न महामंडळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांना सुरक्षितेची हमी देण्यासाठी प्रत्येक बसमध्ये आता अग्निशमन यंत्र बसविले जाणार आहे. त्यासाठी सध्या 360 यंत्र उपलब्ध झाले आहेत. गणेशोत्सवासाठी नगर विभागाच्या 125 बस कोकणात रवाना झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलत दिली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले. त्यानुसार सर्व अकरा आगारांत ही व्यवस्था केली असून, शुक्रवारपासून अंमलबजाणी सुरु झाली. आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास मोफत प्रवास उपलब्ध होणार असल्याचे विभाग नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले.

रक्षाबंधनमध्ये पावणेचार कोटींचे उत्पन्न
रक्षाबंधन व 15 ऑगस्टच्या आसपास असणार्‍या सुट्ट्यामुळे बसला भरपूर गर्दी होती. त्यातून पावणेचार कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, कोरोना काळात बससेवा ठप्प होती. त्यामुळे उत्पन्न नव्हते. त्यामुळे डिझेल, टायर व इतर खर्च असे एकूण पावणेदोन ते दोन कोटी रुपये पुरवठादारांची उधारी देणे बाकी होते. सध्या बससेवा सुरळीत सुरू असल्यामुळे पन्नास टक्के उधारी मिटविली असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news