शिंगणापूरला भाविकांची मांदियाळी

शिंगणापूरला भाविकांची मांदियाळी

सोनई : पुढारी वृत्तसेवा : शनिशिंगणापूर येथे शनिवारी (दि.27) दर्श पिठोरी अमावस्येनिमित्त भरलेल्या यात्रेस दिवसभरात चार लाख भाविकांनी हजेरी लावत, शनिदेवाचे दर्शन घेतले. अमावस्या दुपारपर्यंतच असल्याने सायंकाळनंतर गर्दीचा ओघ कमी झाला होता.
अमावस्येनिमित्त शनैश्वर देवस्थान ट्रस्टने वाहनतळ, दर्शन व्यवस्था, आरोग्य टीम, रुग्णवाहिका, सुरक्षा आदीबाबत नियोजन केले होते. शुक्रवारी रात्रीनंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी नऊ वाजता सुरु झालेली गर्दी दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात होती. वाहनांची गर्दी वाढल्यानंतर मुळा कारखाना गेट व शनैश्वर रुग्णालय येथील वाहनतळावर वाहने लावून भक्तांना दोन किलोमीटर पायी जाऊन दर्शन घ्यावे लागले.

शुक्रवारी रात्री बारा वाजता राहुल गोडसे यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. शनिवारी पहाटे साडेचार वाजता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, मेहतानी व ऑस्ट्रेलियाचे शनिभक्त राकेशकुमार यांच्या हस्ते आरती झाली. दुपारची मध्यान्ह आरती झिम्बावे येथील शनिभक्त जयेश शहा यांच्या हस्ते झाली. सायंकाळची आरती ओरिसाचे आरोग्यमंत्री नब किशोरी दास यांच्या हस्ते झाली.
यात्रेनिमित्त खेळणी, मेवा-मिठाईचे स्टॉल लागले होते. पंकज मित्तल (दिल्ली), मेहता मंडळ (मुंबई), शनिदेव सेवा समिती(हरियाणा), विशाल भंडारा(दिल्ली), अशोक गर्ग (सिरसा) व बबलूभाई मित्र मंडळाने आलेल्या भाविकांना चहा, खिचडी, नाश्ता व जेवणाचा प्रसाद वाटला. माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवरांनी शनीदेवाचे दर्शन घेतले.

लटकूंकडून भाविकांची अडवणूक कायम
शनैश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व व्यवस्था करूनही वाहनतळ ते शिंगणापूर या मार्गावर मोटारसायकलवरील लटकूंनी भाविकांची अडवणूक केली. वाहनतळापासून भाविकांना घेऊन जाणार्‍या रिक्षा ठराविक दुकानांवर नेऊन सक्तीने पूजेचे साहित्य देत होते. त्याचा मोठा त्रास अनेक भाविकांना सहन करावा लागला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news