राहुरी : तीन तोतया अधिकार्‍यांची धुलाई ! | पुढारी

राहुरी : तीन तोतया अधिकार्‍यांची धुलाई !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहरातील एका खानावळीमध्ये (दि. 24) ऑगस्ट रोजी तिघेजण घुसले. खानावळीमधील मालक महिलेसह त्यांनी ग्राहकांना दमदाटी केली. ग्राहकांना बाहेर हाकलून देत दारूचा साठा कोठे आहे, अशी विचारणा करून दहशत निर्माण केली. मात्र, त्या तिघांची पाच ते सहा तरुणांनी यथेच्छ धुलाई केली. राहुरी शहर हद्दीत नवीपेठ परिसरात एक खानावळ आहे. (दि. 24) रोजी दुपारच्या दरम्यान तिघेजण त्या खानावळीत घुसले.

आम्ही एलसीबी पथकातील अधिकारी असल्याचे सांगत, त्या तिघांनी प्रचंड दहशत निर्माण केली. खानावळीतील ग्राहकांना बाहेर हाकलून दिले. त्यानंतर त्या तिघा जणांनी मद्य प्राशन करून यथेच्छ जेवण केले. नंतर पुन्हा दहशत करून बिल न देता निघून गेले. जाताना खानावळीतील महिलेला मोबाईल नंबर देऊन मालक आल्यावर फोन करायला सांगीतले. संध्याकाळी खानावळीचे मालक आल्यावर त्यांना घडलेला प्रकार कळाला. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन करून चौकशी केली.

तेव्हा संबंधित तिघांनी वाढवायचे की मिटवायचे, असे बोलून तोडपाणीची भाषा केली. ते तिघेजण रात्री 9 वाजेदरम्यान पुन्हा त्या खानावळीत तोडपाणी करण्यास आले. यानंतर खानावळीच्या मालकाबरोबर चर्चा सुरू झाली. मालकाला संशय येताच त्यांनी त्या तिघांना, ‘तुमचे आय कार्ड दाखवा,’ असे सांगितले. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने खानावळ मालकाचा संशय बळावल्याने त्यांच्यासह इतर पाच ते सहा तरुणांनी त्या तिघांना धरून यथेच्छ धुलाई केली. दरम्यान, दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर एका जणाने, ‘आम्ही एलसीबी वगैरे कुठलेच अधिकारी नाही,’ असे कबूल करून गयावया केली. त्याची मनसोक्त धुलाई करून नंतर त्याला सोडून देण्यात आले. या घटनेची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.

Back to top button