अखेर अग्निवीरांसाठी अधिकारी मैदानात, प्रशासनाकडून दुकानांच्या दरपत्रकाची तपासणी | पुढारी

अखेर अग्निवीरांसाठी अधिकारी मैदानात, प्रशासनाकडून दुकानांच्या दरपत्रकाची तपासणी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सहा जिल्ह्यांच्या तरुण व तरुणींसाठी सैन्य दल भरतीचे स्वप्न साकार करण्यासाठी अग्निवीर भरती प्रक्रियेला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी अनिल पवार यांनी प्रशासन अधिकार्‍यांसह विद्यापीठ हद्दीमध्ये दुकानांची तपासणी केली. तरुणांच्या गाठीभेटी घेत अडी- अडचणींवर चर्चा केली. म. फुले कृषी विद्यापीठामध्ये अ.नगरसह लातूर, बीड, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील तरूणांचा ओघ सुरूच आहे. भारतीय सैन्य दलामध्ये जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक, स्टोअर कीपर, टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेडमन अशा विविध पदांसाठी दैनंदिन पाच हजार विद्यार्थी व त्यांचे पालक विद्यापीठ हद्दीमध्ये दाखल होत आहे.

सैन्य दलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनेनुसार गर्दी होऊ नये, तसेच कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून कॅम्प हद्दीत तीन मुख्य दुकान व हॉटेल व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली. त्या परिस्थितीचा लाभ घेत काही खासगी दुकानदारांनी कॅम्प बाहेर अव्वाच्या-सव्वा दरामध्ये खाद्य व पिण्याचे पाणी विक्री सुरू केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले, प्रांताधिकारी पवार यांसह तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांसह सैन्य दलाचे अधिकारी कर्नल कर्की, मेजर अमित यांनी संयुक्त दौरा करीत दुकान, हॉटेल व्यावसायिकांची पाहणी केली.

भरतीसाठी आलेल्या तरुण, तरुणींना येणार्‍या अडचणी व त्यावरील उपाययोजना तत्काळ करण्यात आल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा प्रशस्त परिसर व रस्त्यालगतच असल्याने तरुणांच्या सोयीचे दृष्टीने उचित उपाययोजना होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यापीठ हद्दीमध्ये अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाण्याची मुबलक सुविधा आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या तरुणांना कॅम्पमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे. सैन्य दलाकडून तरुणांची उंची तपासणी झाल्यानंतरच प्रवेश दिला जातो.

उंचीमध्ये कमी भरल्यास तत्काळ बाहेर जाण्यासाठी विशेष गेट, तर रनिंगमध्ये अपयशी ठरलेल्यांसाठी दुसर्‍या एक्झिट गेट उपलब्ध आहे. त्यामुळे कोठेही चेंगराचेंगरी होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे तहसीलदार शेख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनाकडून अग्निवीर कॅम्पसाठी 6 लाखांचा निधी मिळाला होता. कमी निधीमध्ये प्रशासनाने उचित नियोजन केले आहे. जागोजागी स्वच्छ पाण्याचे नियोजन व तरुण-तरुणींसाठी वैद्यकीय पथकाकडून तपासणी व ओआरएस पाणी मोफत दिले जात आहे. त्यामुळे विद्यापीठात अग्निवीर कॅम्पमध्ये नियोजनात्मक भरती प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, कॅम्प बाहेर जर कोणाला त्रास होत असेल किंवा कोणतीही अडचण आल्यास सैन्य दलाकडून तक्रारपेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रार आल्यास तत्काळ दखल घेतली जात असल्याचे तहसीलदार शेख म्हणाले. पोलिस निरीक्षक दराडे यांनी सांगितले की, सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे. कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. दैनंदिन 5 हजार तरुण-तरुणींसह पालक व त्यांचे शिक्षक असे 6 ते 7 हजार जणांची गर्दी विद्यापीठ हद्दीत होत आहे. पोलिस अधिकार्‍यांसह सुमारे 200 पेक्षा अधिक पोलिस कर्मचार्‍यांकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

तर तत्काळ संपर्क साधा : तहसीलदार शेख
विद्यापीठ कॅम्प व परिसरात पाहणी झालेली आहे. तरुणांना सैन्य दलाकडून वेळ देण्यात आलेली आहे. त्यावेळेत भरतीसाठी हजर रहावे अशा सूचना आहेत. गर्दी होऊ नये व कोणीही एजंटगिरीच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करू नये म्हणून कमी दुकाने कॅम्पमध्ये आहेत. परंतु तरुणांना कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही. कोणाकडून खाद्य पदार्थ किंवा पाण्यासाठी अधिक पैसे उकळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले आहे.

10 रुपये किमतीतच पाण्याची बाटली
प्रशासनाने पाहणी केल्यानंतर दुकानदारांनी आपले दरपत्रक बदलल्याचे दिसून आले. 15 किंवा 20 रुपयांना कॅम्प बाहेर पाण्याची बाटली विक्री सुरू होती. 10 रुपयांनाच पाण्याची बाटली विक्री करण्याचे आदेश मिळाल्याने तरुणांना कमी किमतीत पिण्याच्या पाण्याची बाटली मिळत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Back to top button