

सुपा : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर नगर ते शिरूरपर्यंत तोडलेले रस्ता दुभाजक (डिव्हायडर) पुन्हा पोलिस बंदोबस्तात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोक्याचे वळण असलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याच्या सूचना चेतक एन्टरप्रायजेस कंपनीला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यावरील साईडपट्ट्या मुरूम टाकून भरण्यात येणार आहेत. केडगावच्या वेशीजवळचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने, तो सुटण्यास वेळ लागणार आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची जबाबादारी सुपा, नगर तालुका व महामार्ग पोलिसांवर टाकण्यात आली आहे.
नगर-पुणे महामार्गावर वारंवार अपघात घडत असून, आठवड्यात आठ लोकांचा बळी गेला आहे. बेजबाबदार प्रशासनामुळे अपघात वाढल्याबाबतचे वृत्त 'दैनिक पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, चेतक कंपनीचे अधिकारी, महामार्ग पोलिस, व स्थानिक सुपा पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची संयुक्तरित्या तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले.
आठ दिवसांपासून महामार्गावर रोज एक जणांचा अपघातात मृत्यू होतो. तरी प्रशासनावर जाग येत नव्हती. मागील महिन्यातही चार लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान काळात महामार्गावरील अपघात थांबता थांबेना, अशा आशयाचे वृत्त 'दैनिक पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. एका प्रशासकीय अधिकार्याने फक्त फोनवर माहिती घेतली होती. परंतु, प्रशासनाला उपाययोजना करता येईना. महामार्गावर दहा वर्षांत 450 लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघात थांबत नाहीत. महामार्गावर नगर शहराचे उपनगर केडगाव येथे भूसंपादनाचे काम अद्याप प्रलंबित आहे. पारनेर तालुक्यातील सुपा व नारायण गव्हाणजवळ सकाळी व सायंकाळी वाहनांची कोंडी कायम बघायला मिळते. या वाहन कोंडीचा प्रश्न दहा वर्षांत प्रशासनाला सुटलेला नाही. वाहन चालकांना महामार्गावर मोठी कसरत करावी लागते. महामार्गावर हॉटेल्ससमोर अनेकांनी डिव्हायडर तोडलेले आहेत. रस्ता क्रॉसिंग करताना अपघात होतात. चार दिवसांपूर्वी सुप्यातील उद्योजक बाळासाहेब पवार यांनाही मृत्यू सामोरे जावे लागले. महामार्गावर डिव्हायडर तोडणार्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे.
महामार्गावर अपघात नेमके कुठे होतात व का होतात, यासाठी दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, राज्य परिवहन महामंडळ, स्थानिक पोलिस ठाणे व नगर तालुका पोलिस ठाणे, महामार्ग पोलिस यांनी अपघातांसंदर्भात बैठक घेतली होती. त्यावर उपाययोजना पण सुचविल्या होत्या. दरम्यान काळात प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर महामार्गावरील अपघातासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय अधिकार्याने जोखीम पत्करली नाही. प्रशासनाने प्रवाशाची मोठी अग्निपरीक्षा घेतली.
पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दुभाजक टाकण्यास सुरुवात केली होती. परंतु, काही राजकीय मंडळींनी दबावतंत्र करून ते काम बंद पडले होते. डिव्हायडर तोडल्यामुळे अपघात तर होतात. पण, रात्रीच्या वेळी रस्तालूट करून चोरटे पटकन निघून जातात. पूर्वीसारखे वाहन अडवून तपासणी करण्यावर पोलिसांना मर्यादा आलेल्या आहेत. पोलिस लांबूनच फोटो काढतात. ऑनलाईन दंड भरण्याची कसरत करतात.
बैठकीस पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता वसंत पारधे, महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक शशिकांत गिरी, सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन कुमार गोकावे, उद्योजक योगेश रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड आदी उपस्थित होते.
गतिरोधक टाकण्याची मागणी
सुपा रस्त्यावर वाहन चालकांची संख्या वाढली. यातील बरीचसे वाहन चालक टोल चुकविण्यासाठी सुपा चौकातून जाण्याचा मार्ग अवलंबतात. अशा बेजबाबदार वाहन चालकांमुळे अपघात होतात. दहा दिवसांपूर्वी या अपघातात वाळवणेच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अवजड वाहतुकीस आळा बसणे गरजेचे आहे. सुपा ते औद्योगिक वसाहत चौकापर्यंत जादा गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शिवसेनेकडून प्रशासनाचे आभार
सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, राज्य परिवहन महामंडळ विभाग, महामार्ग पोलिस, नगर तालुका व सुपा पोलिस ठाणे, प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन प्रवाशांना न्याय देण्याची मागणी आपण केली होती. प्रशासनाने सुपा पोलिस ठाण्यात तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्याबद्दल पारनेर तालुका शिवसेना उपप्रमुख आप्पासाहेब देशमुख यांनी प्रशासनाचे आभार मानले.