नगर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार | पुढारी

नगर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथे गुरुवारी (दि.25) रोजी सकाळी सहाच्या सुमारास वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार तर दोन जखमी झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हा वन्यप्राणी बिबट्या की लांडगा, याबाबत संभ्रम आहे.

जेऊर येथील माळखास शिवारात विमल अशोक बर्डे यांच्या मालकीच्या शेळ्यांच्या पालावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला. त्यामध्ये दहा शेळ्या ठार, तर दोन शेळ्या गंभीर जखमी झालेल्या आहेत. जेऊर परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्यात आलेल्या आहेत. बिबट्याची दहशत ग्रामस्थांत पसरली असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विमल बर्डे व अशोक बर्डे हे पती-पत्नी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेले असताना, शेळ्यांच्या पालावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला. बर्डे पती-पत्नीच्या सांगण्यावरून हा हल्ला बिबट्यांनीच केला असून, त्यांनी दोन बिबटे पाहिल्याचे सांगितले. उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्रीराम जगताप व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत शेळ्यांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी केले.

वन विभागाच्या म्हणण्यानुसार हल्ला बिबट्याने नव्हे तर लांडग्याच्या कळपाकडून झाला आहे. बिबट्या हा सकाळी शिकार करत नसून, तसेच एवढ्या शेळ्यांना ठार करण्याऐवजी एखादी शिकार घेऊन तो पलायन करत असतो, अशी स्पष्टोक्ती वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. यावेळी गणेश आवारे, दिनेश बेल्हेकर, दत्तात्रय डोकडे, भानुदास हसनाळे, हर्षल तोडमल, पिंपळगाव माळवीचे माजी सरपंच पप्पू झिने उपस्थित होते.

नुकसान भरपाई मिळावी : झिने

विमल बर्डे यांच्या दहा शेळ्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. हे कुटुंब गरीब असून, दुसर्‍याच्या शेतात काम करून आपली उपजीविका भागवत आहे. दहा शेळ्या ठार झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना वन विभागाच्या वतीने तात्काळ मदत मिळण्याची गरज आहे. तसेच, जेऊर परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पप्पू झिने यांनी केली आहे.

Back to top button