नगर : ‘आदर्श’ साठी शिक्षकांची परीक्षा; 3 गुरुजींची दांडी ! | पुढारी

नगर : 'आदर्श' साठी शिक्षकांची परीक्षा; 3 गुरुजींची दांडी !

नगर, पुढारी वृत्तसेवा : आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी शुक्रवारी गुरुजींची इन कॅमेरा लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेला 40 शिक्षक हजर होते, तर 3 गुरुजींनी दांडी मारल्याचे दिसले.

दरवर्षी शिक्षकदिनी 5 सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होत असते, मात्र दोन वर्षांपासून ते झालेले नाही. आता तिसरे वर्ष असून, या वर्षीच्या आदर्श शिक्षकांच्या निवडीसाठी काल सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी 43 गुरुजींची परीक्षा घेतली. यात, 13 पेक्षा अधिक महिला शिक्षिका होत्या.

उपस्थित 40 गुरुजी परीक्षार्थींना 25 गुणांचे 25 प्रश्न दिले होते. एका वाक्यात उत्तरे, असे प्रश्नांचे स्वरूप होते. या परीक्षेसाठी एका तासाचा कालावधी देण्यात आला होता. उपजिल्हा शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

मध्यंतरी जिल्हास्तरीय पथकाने संबंधित परीक्षार्थींच्या शाळांना भेटी देऊन मूल्यमापन केलेले आहे, त्याचे गुण आणि लेखी परीक्षेचे गुण विचारात घेऊन अंतिम पुरस्कारार्थी निवडले जाणार आहेत. साधारणतः 3 सप्टेंबर पर्यंत पुरस्कारर्थींची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 सप्टेंबरला तीन वर्षांच्या कमीत कमी 45 शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Back to top button