नगर : 660 हेक्टर शेतपिकांचे नुकसान, 19763 शेतकर्‍यांना फटका | पुढारी

नगर : 660 हेक्टर शेतपिकांचे नुकसान, 19763 शेतकर्‍यांना फटका

नगर :  पुढारी वृत्तसेवा : जून व जुलै या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 660 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका 19 हजार 763 शेतकर्‍यांना बसला आहे. या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 2 कोटी 12 लाख रुपयांची मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. यंदाचा पावसाळा देखील चांगला आहे. जून महिन्यात संगमनेर, श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव तालुक्यांतील 18 गावांतील 127 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 444 शेतकर्‍यांना बसला आहे. या शेतकर्‍यांना नुकसापोटी अनुदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 18 लाख 66 हजार 174 रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

जुलै महिन्यात अकोले तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. या तालुक्यातील 112 गावांतील 433 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना हेक्टरी अनुदान मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 1 कोटी 93 लाख 19 हजार रुपयांची मागणी केली आहे. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होताच बाधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत जमा होणार आहे.

ऑगस्टमध्ये शेतपिकांचे नुकसान
ऑगस्ट महिन्यात देखील कोपरगाव, राहुरी व राहाता या तीन तालुक्यांत 24 गावांत अतिवृष्टीची नोंद झाली. प्राथमिक अंदाजानुसार 2 हजार 481 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका 4 हजार 308 शेतकर्‍यांना बसला आहे. अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर नुकसानीचा आकडा राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.

 

Back to top button