नगर : पुढारी वृत्तसेवा : टीईटी घोटाळ्यातील चौकशी पथकाच्या अधीक्षकांनी वशिल्यावर उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे ऑगस्ट 2022 चे वेतन व भविष्य निर्वाह निधी थांबविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बोगस 13 शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील 10 बोगस टीईटीधारक असल्याची यादीच आता समोर आली आहे. माध्यमिकमधील 3 शिक्षकांची नावे पुढे आली आहेत. हा आकडा वाढूही शकतो.
दरम्यान, जिल्ह्यातील टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या आदेशान्वये वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांनी वेतन थांबविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेला पत्र पाठविल्याने बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. त्यानुसार खासगी शाळेतील 10 पैकी 5 शिक्षकांचे पगार थांबवले आहेत, तसेच पाच शिक्षक विनाअनुदानीतवर असल्याने त्यांनाही याचा फटका बसणार आहे. याशिवाय माध्यमिक अंतर्गत संस्थावरील 3 शिक्षकांचे वेतन रोखण्याचे पत्र शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना प्राप्त झाले आहे.