नगर : बार बंद करण्याच्या मागणीसाठी अकोलेत मोर्चा | पुढारी

नगर : बार बंद करण्याच्या मागणीसाठी अकोलेत मोर्चा

अकोले, पुढारी वृत्तसेवा : अकोले शहरातील सुरभि परमिट बारचे मालक सुरेश कालडा यांचे मद्य विक्री दुकान कायमस्वरुपी बंद करण्यासाठी सामाजिक संघटना व राजकीय पक्षानी मोर्चा काढून ठिय्या आदोलन केल्यानंतर कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने तहसीलदार सतीश थेटे व स.पो.नि.मिथुन घुगे यांनी सुरभि परमिट बार बंद केले आहे.

संगमनेर येथील रायतेवाडी मध्ये दि.15 ऑगस्ट रोजी बनावट दारूसाठा आढळल्या प्रकरणातील आरोपी सुरेश मनोज कालडाचे अकोलेतील सुरभि परमिट बिअर बार दुकानाशी संबंध असल्याने दारु उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकुन दारू विक्रेत्याने (ब्रिज केस) नियमभंग केल्या प्रकरणी शिवकुमार मनोज कालडाला अटक करुन सुरभि बारवर कडक कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला होता. तरीही सुरभि बार सुरु असल्याने हे सुरभि परमिट रुम बंद करण्याची मागणी करीत या परमीट रूम चालकाला पाठिशी घालणार्‍या प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

बनावट दारू बंद करुन संबंधीतावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर सामाजिक संघटना व राजकीय पक्षानी मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. कालडा यांचे मालकीचे दुकान बंद करण्यातबाबतचे निवेदन तहसीलदार थेटे यांना दिले.

सुरभि बार फोडण्याचा इशारा देत आक्रमक भूमिका आदोलकांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. त्यामुळे तहसीलदारांच्या दालनात तहसीलदार सतीश थेटे आणि स.पो.नि.मिथुन घुगे यांनी तात्काळ बैठक घेऊन जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने सुरभि परमिट दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. या मोर्चामध्ये महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, मच्छिंद्र मंडलिक, सुरेश नवले,गणेश कानवडे, रमेश राक्षे, नितीन नाईकवाडी, डॉ.रामहरी चौधरी आदी सहभागी झाले होते.

Back to top button