नगर : शेतकर्‍यांच्या वादात अडकला रस्ता | पुढारी

नगर : शेतकर्‍यांच्या वादात अडकला रस्ता

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील इमामपूर शिव रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. नगर – औरंगाबाद महामार्गावरील लिगाडे वस्ती ते लक्ष्मी माता मंदिर हा इमामपूर शिवरस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी अनेक वर्षांपासून शेटे वस्ती, लिगाडे वस्ती, तोडमल वस्ती, इमामपूर परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

इमामपूर शिवरस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले होते. लक्ष्मी माता मंदिर ते खारोळी नदीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. खारोळी नदीवरील पुलाचे कामही झाले असून, या रस्त्याच्या कडेने पाणी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे बांध वाहून गेले आहेत. खारोळी नदी ते लिगाडे वस्ती हा रस्ता शेतकर्‍यांच्या वादात अडकला आहे.

नागरिकांचे हाल

अर्धवट रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यावर पाणी व चिखल साचला असून, दूग्ध व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. शाळेच्या बसलाही पावसाळ्यात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रस्त्याने जाता येत नाही. रस्त्याने पायी जाणेदेखील अवघड बनले आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा रस्ता शेतकर्‍यांच्या वादात अडकला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे वारंवार लेखी, तोंडी मागणी करूनही रस्त्याचे अपूर्णच आहे. ज्या शेतकर्‍यांच्या वादात रस्ता अडकला, त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून रस्ता पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

इमामपूर शिवरस्त्याचे अर्धवट काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शरद आवारे, अविनाश तोडमल, संभाजी तोडमल, गणेश शेटे, सुरज तोडमल, गणेश टिमकरे, दिगंबर सुंबे, नंदू तोडमल, बाळू शेटे, संदीप तोडमल, महेंद्र तोडमल, भाऊसाहेब जरे, नरेंद्र तोडमल व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

ज्या शेतकर्‍यांच्या वादात रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्या क्षेत्राची मोजणी करून रस्त्याचे काम पूर्ण करा. यासाठी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. निवेदन देऊन काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

                                                                                      – शरद आवारे, नागरिक.

रस्त्याचे काम शेतकर्‍यांच्या वादात अडकले. याबाबत प्रशासनाने दखल घेतली, तर रस्ता तत्काळ पूर्ण होऊ शकतो. शेतकर्‍यांचा वाद मिटवण्यासाठी महसूल विभागाने शेतकर्‍यांची, तसेच नकाशा प्रमाणे रस्त्याच्या क्षेत्राची मोजणी करावी. परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

                                                                              – अविनाश तोडमल, नागरिक.

Back to top button