नगर : पुणतांब्याच्या पाणी योजनेकडे ग्रामस्थांचे लक्ष | पुढारी

नगर : पुणतांब्याच्या पाणी योजनेकडे ग्रामस्थांचे लक्ष

पुणतांबा, पुढारी वृत्तसेवा : गावाला दररोज पाणी मिळणारी नवीन योजना कधी कार्यान्वित होणार? याबाबत ग्रामस्थांत चर्चा दिसत आहे. या योजनेत अनेक त्रूटी व कामाबाबत विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात असल्या, तरी पाठपुरावा नसल्याने योजना अद्याप सुरू झालेली नाही.

‘जलस्वराज्य टप्पा 2’ या 17 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचे चार वर्षांपासून सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून लवकरच योजना कार्यान्वित होणार, असे गेल्या सहा महिन्यांपासून सांगितले जात असले, तरी संपूर्ण योजना अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

पुणतांबेकरांना सध्या पाच-सहा दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत असून, येथील पाणीप्रश्नावर अनेक निवडणुका झाल्या. त्यामध्ये हा प्रश्न चर्चेला गेला. पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून योजना कामाच्या सुरुवात झाली. यात नवीन साठवण तलाव, पाच कि. मी. अंतराची जलवाहिनी, चार जलकुंभ, अंतर्गत जलवाहिनी, मीटर पध्दतीने नळ जोडणी ही कामे पूर्ण झाली आहेत. कामात असलेल्या त्रुटी आणि दर्जाबाबत वेळोवेळी बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी समक्ष तक्रारी करूनही दखल न अद्याप काही त्रुटी आहेत.

योजना कार्यान्वित करण्याचा कालावधी होऊन गेला आहे. काही भागात पाणी चाचणी यशस्वी झाली असली, तरी अन्य भागात चाचणी घेण्यास अडचणी निर्माण होत आहे. विरोधकांकडून योजना मंजुरी तसेच त्रुटी आणि दर्जाबाबत गाजावाजा करून चौकशी करण्याची मागणी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पाठपुरावा केला जात नाही.

जीवन प्राधिकरणचे संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर योजना कामाच्या सुरू झालेल्या चौकशीचा अहवाल काय सादर करण्यात आला? याची माहिती समजू शकली नाही. योजना मंजुरीवरील ‘श्रेयवाद आणि त्रुटी’ याबाबी आता बाजूला ठेवून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न होऊन गावाच्या संपूर्ण भागाला पूर्ण दाबाने आणि दररोज पाणी मिळण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

पाणी योजनेवरून खडाजंगीची शक्यता?

पाणी योजना कार्यान्वित होण्यास होणारा विलंब, यामधील त्रुटी तसेच काही वाड्या-वस्त्यांवर योजना का गेली नाही, यासह काही मुद्यांवर आज (दि. 23) मंगळवारी होणारे ग्रामसभेत सत्ताधारी आणि विरोधकांत चर्चा होऊन खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Back to top button