नगर : ग्रामसभेबाबत जेऊर ग्रामस्थांमध्ये उदासीनता | पुढारी

नगर : ग्रामसभेबाबत जेऊर ग्रामस्थांमध्ये उदासीनता

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामस्थांमध्ये ग्रामसभेबाबत उदासीनता आल्याचे चित्र गावामध्ये झालेल्या ग्रामसभांवरून दिसून येते. या ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित राहत नाहीत, असा अनुभव आहे. ग्रामस्थ का उपस्थित राहत नाहीत, यासाठी ग्रामपंचायतने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.

जेऊर तालुक्यातील मोठे गाव असून, लोकसंख्या 20 हजारांच्या घरात आहे. ग्रामसभा कायदा सुरू झाल्यापासून प्रत्येक ग्रामसभेसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा गावचा इतिहास आहे. ग्रामसभा कधी खेळीमेळीत, तर कधी वादळी होऊन नागरिक आपल्या समस्या मांडत असतात. त्यामुळे जेऊरच्या ग्रामसभेची चर्चा तालुक्यात होत असे. या ग्रामसभेत काय होणार याची उत्सुकता संपूर्ण परिसरातील गावांना असते.

धनगरवाडी, इमामपूर, बहिरवाडी, डोंगरगण, ससेवाडी गावांतील ग्रामस्थांचे बहुतेक सर्वच व्यवहार जेऊरशी जोडले असल्याने या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहते. या ग्रामसभेत ग्रामस्थ ही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या समस्या, तसेच गाव विकासाबाबत राबवायच्या योजनांवर सविस्तर चर्चा करतात; परंतु गेल्या काही ग्रामसभा पाहता आश्चर्य वाटावे. ही परिस्थिती जेऊरमध्ये निर्माण झाली. ग्रामसभेसाठी ग्रामस्थ उपस्थित रहात नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. ग्रामसभेचे अधिकार, महत्त्व जेऊर ग्रामस्थांना चांगलेच ज्ञात असल्याचे यापूर्वी झालेल्या ग्रामसभांमधून दिसून आले आहे, तरीही जेऊर ग्रामस्थ ग्रामसभेकडे पाठ का फिरवतात याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकार्‍यांनी निश्चितच आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत काही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

ग्रामसभांना उपस्थितांची संख्याच कमी

जेऊर ग्रामपंचायतीत 17 सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, विविध विभागाचे अधिकारी असे मिळून ही संख्या पन्नासच्या घरात जाते. 24 एप्रिलच्या ग्रामसभेत पदाधिकारी धरून 11 जण उपस्थित होते. 30 मेची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करावी लागली. तीच ग्रामसभा 10 जून रोजी घेण्यात आली. यावेळीही सदस्य धरून अवघे 14 नागरिक उपस्थित होते. 28 जुलैच्या ग्रामसभेत सदस्यांसह फक्त 14 नागरिक उपस्थित होते. तीच परिस्थिती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजिलेल्या 5 ऑगस्टच्या ग्रामसभेत पहावयास मिळाली. एकूण 18 जणांनीच उपस्थिती होती.

ग्रामसभांकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष

कोरोनाच्या लाटेपूर्वी 11 फेब्रुवारी 2020 रोजी ग्रामसभा झाली होती. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2021 रोजीची ग्रामसभा चांगलीच चर्चेत आली होती. तर, 26 जानेवारीची ग्रामसभा कोरोनामुळे ऑनलाईन झाली होती. या ग्रामसभा झाल्यानंतर आताच्या ग्रामसभांची परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी ग्रामसभांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

Back to top button