नगर : टाकळीभान टेलटँक झाला तुडूंब! | पुढारी

नगर : टाकळीभान टेलटँक झाला तुडूंब!

टाकळीभान, पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेला टाकळीभान टेलटँक पूर्ण क्षमतेने भरल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 1972 च्या दुष्काळात माजी कृषिमंत्री दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नांतून टाकळीभान टेलटँकची निर्मिती झाली.

स्वतःचा पाण्याचा स्त्रोत नसल्याने टेलटँक भंडारदरा धरणाच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून कालव्याद्वारे भरण्याची तरतूद आहे. या टेलटँकला कालवा आहे. या कालव्याद्वारे टाकळीभानचा काही भाग व घोगरगावची शेती सिंचनाखाली आली आहे. टेलटँकची साठवण क्षमता 197 द.ल.घ.फू. आहे. या टेलटँकच्या पाझरामुळे टाकळीभानसह 7 ते 8 गावांची शेती बागायती होऊन परिसर सुजलाम्- सुफलाम् झाला आहे.

टेलटँकजवळ टाकळीभानसह परिसरात 8 गावांच्या पाणी पुरवठा योजना असल्याने या टेलटँकच्या पाणी पातळीकडे परिसराची नेहमी बारीक नजर राहते. जलसंपदा विभागाला या टेलटँकमुळे पाणीपट्टीच्या माध्यमातून महसूल मिळतो. दोन वर्षांपासून आ. लहू कानडे जलसंपदा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने या पाण्याचे नियोजन करीत असल्याने टेलटँकची पाणीपातळी टिकवून असते.

Back to top button