श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, अनेक ठिकाणी झालेल्या चोर्या आणि चोर्यांचा न होणारा उलगडा, यावरून श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चोरट्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिस यंत्रणा काही पावले उचलणार का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात श्रीगोंदा आणि बेलवंडी अशी दोन पोलिस ठाणी कार्यरत आहेत. श्रीगोंदा तालुक्यात दरोड्याचे प्रकार थांबले असले, तरी चोर्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घरफोडी, शस्त्राचा धाक दाखवून लूटमारीच्या घटनांनी तालुका पुरता हादरून गेला आहे. पोलिस दप्तरी या गुन्ह्यांची किरकोळ स्वरुपात दखल घेतली जात असली, तरी सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
मात्र, या बाबीकडे पोलिसांकडून डोळेझाक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी पारगाव येथे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून ऐवज लुटून नेला. मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत.
यापूर्वी श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीगोंदा शहर, मढेवडगाव, काष्टी, या भागात चोरट्यांनी अनेक ठिकाणी चोर्या केल्या. श्रीगोंदा पोलिसांकडून काही गुन्ह्यांची उकल झाली असली, तरी अनेक गुन्ह्यांचा प्रलंबित तपास पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
हीच परिस्थिती बेलवंडी पोलिस ठाण्याबाबत आहे. बेलवंडी भागासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असताना बेलवंडी, पिंपळगाव पिसा, कोळगाव भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन महिन्यांत बेलवंडी, पिंपळगाव पिसा, कोळगाव यासह इतर काही गावात चोर्या झाल्या आहेत. बेलवंडी व कोळगाव येथे झालेल्या चोर्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असताना सुद्धा तपासाला गती येत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेलवंडी भागात अनेक ठिकाणी चोर्या झाल्या. नागरिकांनी पोलिसांकडे वाढत्या चोर्यांबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, कर्मचारी कमी असल्याचे सांगून पोलिस वेळ मारून नेतात. या गुन्ह्यांच्या तपासाचे पुढे काय झाले? याची विचारणा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहेत. मात्र, तेही याकडे गांभीर्याने पहात नसल्याचेच चित्र आहे.
श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्या गावात मोठ्या चोर्या झाल्या आहेत. रस्ता लुटीचे प्रकार घडले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासाचे पुढे काय झाले? याचा लेखाजोखा पोलिस अधीक्षक तपासून गुन्ह्यांचा उलगडा करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना आखतील का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.