करंजी : शिक्षिकेच्या बदलीसाठी बनावट सह्या अन शिक्के? | पुढारी

करंजी : शिक्षिकेच्या बदलीसाठी बनावट सह्या अन शिक्के?

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी गावातील काही पदाधिकार्‍यांनी निवेदन तयार करून त्यावर चक्क काही ग्रामस्थांच्या बनावट सह्या व शिक्क्याचा वापर केल्याचा प्रकार पुढे आला आहे. निवेदनावरील ग्रामस्थांच्या सह्या खर्‍या की खोट्या, या संदर्भात खुलासा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संबंधित संस्थेला दिले आहेत. करंजी येथील एका शिक्षक नेत्याने गावातील ग्रामपंचायत, सेवा संस्थेच्या काही पदाधिकार्‍यांना हाताशी धरून एका महिला शिक्षिकेची बदली करण्याचे नियोजन आखले.

यामध्ये काही पदाधिकार्‍यांच्या निवेदनावर खोट्या सह्या करून व बनावट शिक्का वापरून महिलेच्या बदली संदर्भातील निवेदन संबंधित संस्थेला व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकार्‍यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी या संबंधित शिक्षिकेने या घाणेरड्या राजकारणाला वैतागून इतरत्र बदली करण्याचा विनंती अर्ज शिक्षण संस्थेकडे केल्यानंतर या शिक्षिकेची इतरत्र विनंती बदली देखील झाली.

दरम्यान, या शिक्षिकेच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रार अर्जात ग्रामस्थांच्या बनावट सह्या व बनावट शिक्का वापरून प्रशासकीय अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासंदर्भातील सबळ पुरावे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आपण सादर केले आहेत. सदर निवेदनावर खोट्या सह्या घेणारा कोण, याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनराज क्षेत्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेकडे केली आहे.

 

Back to top button