

नगर; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथे मार्चमध्ये होणार्या राज्यस्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनाची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे प्रदर्शन भरविले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाकडूनही तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने या प्रदर्शनासाठी नुकतीच 3.74 कोटींची तरतूद केली आहे. 'अहमदनगर महोत्सव' यशस्वी झाल्यानंतर आता मार्च 2023 मध्ये शिर्डी येथे पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जात आहे. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या देखरेखीत या प्रदर्शनासाठी तयारी सुरू आहे.
राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत पशु-पक्षी तसेच त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करण्यासाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे, औषधे, तसेच पशुसंवर्धनासाठी निगडीत बाबींचे स्टॉल उभारणे, जातीवंत पशु-पक्षांमधून सर्वोत्कृष्ट पशुधनाची निवड करून पशुपालकांना सन्मानित करणे, पशुपालकांची प्रदर्शन पाहण्याची व्यवस्था करणे, इतर बाबींसाठी नियोजन केले जात आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाचे संवर्धन करणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावरांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, कृत्रिम रेतन, मुरघास, हायड्रोपोनीक्स तंत्रज्ञानावर शेतकर्यांना मार्गदर्शन करणे, इत्यादीचा फायदा होणार असल्याने हे प्रदर्शन नगरकरांसाठी एक संधी असणार आहे. पुढील महिन्यात हे प्रदर्शन भरणार असून, त्यासाठी शासनाने 3.74 कोटींची तरतूद केली आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या खर्चाचे नियोजन करणार आहे. लवकरच ही तयारी पूर्ण होणार आहे.
खा.डॉ.विखे यांची सीईओंशी चर्चा!
खा. डॉ. सुजय विखे पाटील हे काल दुपारी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य विभागप्रमुखांसमवेत चर्चा केली. शिर्डी येथील पशु-पक्षी मेळाव्याच्या तयारीबाबतही त्यांनी पशुसंवर्धन अधिकार्यांचीही मते जाणून घेतल्याचेही समजले. याप्रसंगी एक्स्प्रेस फिडरसह अन्य वीजप्रश्नांबाबत त्यांनी महावितरणला सूचना केल्या.