राशीन : जखमी काळवीटास दिले जीवदान | पुढारी

राशीन : जखमी काळवीटास दिले जीवदान

राशीन : पुढारी वृत्तसेवा : येथील राऊत वस्ती परिसरात एक काळवीट जखमी अवस्थेत आढळून आले होते. कुत्रे त्याचा पाठलाग करत होते. यशोदानंद गोशाळेचे सेवक सागर राऊत, संदीप राऊत, रवींद्र जाधव यांनी त्याला कुत्रांच्या तावडीतून वाचविले. गोशाळेचे संचालक मिलिंद राऊत यांनी त्यावर प्रथमोपचार केले. यानंतर त्याला वन विभागाकडे सुपूर्द केले. जखमी असून, ही काळवीट ताकदीच्या बळावर पायातील फासे तोडून आले होते.

हे फासे जीवाच्या आकांतेने त्या काळविटाने ओढून ओढून तोडल्याने पायामध्ये मोठी जखम झाली होती. या जखमी झालेल्या काळविटास तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राम अनभुले यांच्या निरीक्षणाखाली काही दिवस ठेवण्यात येणार असून, त्यानंतर त्यास वन विभागाकडून रेहकुरीच्या काळवीट अभयारण्यात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती राशीनचे वनरक्षक ज्योती दाभाडे यांनी दिली.
या काळविटास वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्योती दाभाडे, वनसेवक रामहारी होले व गणेश गदादे, वाहनचालक आबा वाघमोडे यांनी जागेवर येऊन ताब्यात घेतले. यावेळी यशोदानंद गोशाळेचे संचालक मिलिंद राऊत, संदीप राऊत, सागर राऊत, रवींद्र जाधव, बुआसाहेब राऊत, दीपक बेलेकर यांनी काळविटाची देखभाल करून वन विभागाच्या ताब्यात दिले.

Back to top button