श्रीगोंदा : रस्त्याचे काम बंद, प्रवाशांचे हाल आढळगाव ते जामखेड राष्ट्रीय महामार्गावर खोदकाम | पुढारी

श्रीगोंदा : रस्त्याचे काम बंद, प्रवाशांचे हाल आढळगाव ते जामखेड राष्ट्रीय महामार्गावर खोदकाम

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : आढळगाव ते जामखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे. बहुतांश भागात रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत असून, हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. आढळगाव ते जामखेड दरम्यानच्या रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शन ही कंपनी करत आहे. पूर्वीचा रस्ता खोदून त्या जागेवर मुरूम भरण्यात आला. रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली. या कामाबाबत शासकीय पातळीवर तक्रारी झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी या रस्त्याचे काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. या रस्त्यावर मोठी वाहतूक सुरू असते.

पूर्व भागातील नागरिकांचा श्रीगोंदा शहराशी नित्य संपर्क असतो. सगळाच रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागते. त्यात काम बंद ठेवल्याने अडचणीत भर पडली आहे. प्रशासनाने कुठल्या कारणातून काम बंद ठेवले, याची खातरजमा करून हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

‘काम तातडीने सुरू करावे’
युवा नेते शरद जमदाडे म्हणाले, रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात काम बंद ठेवले गेल्याने मोठी अडचण निर्माण झाली. हे काम तातडीने सुरू करण्यात यावे.

दोन दिवसांत निर्णय
तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले, रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले असले, तरी यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सोमवारनंतर काम सुरू होण्याबाबत कार्यवाही होईल.

‘मनमाड रस्त्यासारखी अवस्था नको’
राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नगर- मनमाड रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, मध्येच काम बंद पडल्याने त्या परिसरातील नागरिकांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. तीच गत या भागातील नागरिकांची होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Back to top button