नगर : शहरातून दीड लाखाचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई | पुढारी

नगर : शहरातून दीड लाखाचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

नगर : पुढारी वृत्तसेवा : घरात गुटखा तयार करताना एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, या कारवाईत एक लाख 60 हजारांचा 180 किलो गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक प्रवीण भिंगारदिवे (वय 20, रा. दातरंगे मळा, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कमलेश हरिदास पाथरूट यांनी फिर्याद दिली आहे.

शहरातील मानकर गल्ली येथील सिद्धीविनायक मंदिराजवळ एका घरात आरोपी भिंगारदिवे हा गुटखा तयार करून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार (दि.19) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानकर गल्ली येथे छापा टाकून सदर घराची झाडाझडती घेतली. या छाप्यात सुमारे 180 किलो गुटख्याचा प्रतिबंधित साठा पोलिसांनी जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या साठ्यात आठ हजार रूपये किमतीचा तंबाखू, पंधरा हजार रूपये किमतीची सुंगधी तंबाखू, 42 किलो तयार मावा किमत 42 हजार रूपये, 60 हजार रूपये किमतीची 120 किलो लाल सुपारी आणि मावा तयार करण्याची एक मशीन असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, कॉन्स्टेबल कमलेश पाथरूट, संदीप पवार, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने केली.

 

Back to top button