नगर : कापडबाजारात चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

नगर : कापडबाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. येथील तीन दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अडीच लाख रूपयांच्या रोख रकमेसह दुकानातील कपडे, शूज, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह असा एकूण 2 लाख 64 हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले आहेत. याबाबत प्रसन्न राजकुमार मुथा यांनी फिर्याद दिली आहे.

कापडबाजारातील मुथा ड्रेसेस, मुथा कलेक्शन व चरण शूज या दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. शनिवारी सकाळी दुकाने उघडण्यात आल्यानंतर दुकानातील साहित्याची उचकापाचक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरी झाल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मुथा कलेक्शनमधून 2 लाख , मुथा ड्रेसेसमधून 45 हजार व चरण शूज येथून 8 हजार रोख व तिन्ही दुकानांमधून लॅपटॉप, कपडे, शूज, असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

चोरट्यांनी दुकानांच्या सुरक्षिततेसाठी असलेले सिक्युरिटी डोअर व डिजिटल लॉकर तोडून रोख रक्कम व साहित्याची चोरी केली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

श्वान पथकाला पाचारण
घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाली असल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोतवाली पोलिसांची दोन पथके चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांची गस्त वाढवा : आ. जगताप
दरम्यान, या घटनेनंतर शनिवारी आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापार्‍यांशी संवाद साधला. पोलिसांनी तातडीने शहरात मोठ्या प्रमाणात गस्त वाढवावी. त्याचबरोबर झालेल्या चोरीचा तपास तातडीने करावा.अशा सूचना आ.जगताप यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी संजय चोपडा, प्रा. माणिक विधाते, विपुल शेटीया, अभिजीत खोसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व व्यापारी उपस्थित होते.

Back to top button