अल्पवयीन मुलीचे धर्मांतर प्रकरण ; अखेर पोलिस निरीक्षक सानप यांचे निलंबन | पुढारी

अल्पवयीन मुलीचे धर्मांतर प्रकरण ; अखेर पोलिस निरीक्षक सानप यांचे निलंबन

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील अल्पवयीन मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला. या गंभीर प्रकरणातील आरोपीस पाठीशी घालून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंकज गोसावीनंतर आता शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या निर्देशांनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाढती गुंडगिरी, गावठी कट्टे, गावठी हातभट्ट्या, चोर्‍या, गोवंश हत्या आदींचा सुळसुळाट वाढला असताना शहर पोलिस ठाण्याचे पो. नि. संजय सानप यांच्या कार्य पद्धतीवर काही हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत होते. अशातच अल्पवयीन मुलीच्या या संवेदनशील प्रकरणात जबाबदार ठरवित पोलिस कर्मचारी पंकज गोसावीनंतर पो. नि. संजय सानप यांचेही निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, या वृत्तास अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व डीवायएसपी संदीप मिटके यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीचे धर्मांतर व बळजबरी विवाह या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंकज गोसावी याने आरोपीस साह्य करून पोलिस विभागासह समाजाशी गद्दारी केली आहे.

केवळ निलंबन कारवाई पुरेशी नसून, गोसवीविरुद्ध भा. दं. वि. कलम 34 अन्वये आरोपीशी संगनमत केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे प्रकाश चित्ते, भाजप ज्येष्ठ नेते सुनील मुथा, शिवसेना शहरप्रमुख सचिन बडदे, मनसे तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, ‘आप’चे तालुकाध्यक्ष तिलक डुंगरवाल आदींनी पत्रकातून केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे पदाधिकारी म्हणतात, शहरात एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाला. इम्रान कुरेशी नामक व्यक्तीने अल्पवयीन शालेय मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला.

या प्रकरणी आरोपीवर अपहरण, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व अ‍ॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासह आणखी एका गुन्ह्यात शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पंकज गोसावी याने आरोपीस मदत केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबन केले. वास्तविक पोलिस हे समाजाचे रक्षक मानले जातात. ‘खलनिग्रहणाय’ असे ब्रीद घेऊन पोलिस कार्यरत असतात. असे असताना पंकज गोसावी याने आरोपीला मदत करून, पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून पोलिस दलासह समाजाशी गद्दारी केली. यासाठी निलंबन न करता गोसावीवर आरोपीस मदत केल्याप्रकरणी कलम 34 अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी मुथा, बडदे, शिंदे व डुंगरवाल यांनी केली आहे.

पो. नि. साळवेंनंतर पो. नि. सानपांवर कारवाई
गेल्यावर्षी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावरही कनिष्ठ पोलिस कर्मचार्‍याशी ऑडिओ क्लिपवरील आक्षेपार्ह संभाषणप्रकरणी जिल्हा पोलिस मुख्यालयात तडकाफडकी बदलीची कारवाई करण्यात आली होती. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक साळवेंनंतर आता शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सानप यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Back to top button