शहीद जवान साळवे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अखेरचा निरोप | पुढारी

शहीद जवान साळवे अनंतात विलीन, शासकीय इतमामात अखेरचा निरोप

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत राक्षी येथील शहीद जवान सचिन साळवे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. वंदे मातरम, भारत माता की जय, सचिन साळवे अमर रहे, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात शहीद जवान सचिन साळवे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आसाम येथे लष्करी सेवा बजावत असताना दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील राक्षी येथील जवान सचिन रामकिसन साळवे यांना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर शुक्रवारी (दि.19) सकाळी विमानाने त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले.

तेथून वाहनाने ते त्यांच्या मूळ गावी राक्षी येथे आणण्यात आले. तत्पूर्वी शेवगाव शहरातील क्रांती चौकांत अनेकांनी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देऊन आदराजंली अर्पण केली. साळवे यांचे पार्थिव राक्षी येथे येताच फुलांनी सजविलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला जनसमुदाय अमर रहे अमर रहे सचिन साळवे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत पार्थिवर फुलांचा वर्षाव करीत होता. शहीद साळवे यांचे वडील रामकिसन, आई नंदाबाई, पत्नी मयुरी, सहा वर्षीची मुलगी आरूषी, भाऊ प्रवीण व अशोक यांना पार्थिव पाहताच शोक अनावर झाला. मात्र, तरीही ते अमर रहेच्या घोषणा देताना पाहून अनेकांचे मन हेलावले.

अंत्यसंस्कारच्या व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी शहीद साळवे यांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या मातोश्री, वडील, पत्नी, भाऊ, बहिणी, नातेवाईक, माजी सैनिकांसह अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. शेवटी पोलिस मुख्यालयातून आलेल्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिल्यानंतर, शहीद साळवे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी तहसीलदार छगन वाघ, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, गटविकास आधिकारी महेश डोके यांनी पुष्पचक्र अर्पण केले. राम महाराज झिंजुर्के, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल राजळे, राष्ट्रवादीचे संजय कोळगे, कल्याण नेमाणे, मनसेचे गणेश रांधवणे, वंचितचे किसन चव्हाण, शिवसेनेचे अ‍ॅड. अविनाश मगरे, भाजपचे सुनील रासणे आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आई, भावाची मन हेलावणारी प्रतिक्रिया
माझी दोन मुले देशसेवेसाठी पाठविली होती. दोघेही देशसेवा करीत असताना सचिन हा शहीद झाला, याचा मला अभिमान आहे, असे आई नंदाबाई साळवे याचे वाक्य, तर माझा भाऊ देशसेवा करताना शहीद झाला, याचा मला अभिमान असल्याची मेजर प्रवीण साळवे यांची प्रतिक्रिया मनाला पाझर फोडणारी होती.

 

Back to top button