सिंगल फेज वीज सुमारे पाच महिन्यापासून बंद ; ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या | पुढारी

सिंगल फेज वीज सुमारे पाच महिन्यापासून बंद ; ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कोरडगाव, औरंगपूर, कळसपिंपरी, जिरेवाडी, तोंडोळी व सोनोशी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद माजी सदस्य शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली सिंगल फेज वीज मिळावी या मागणीसाठी पाथर्डीच्या वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या गावांतील शेतीपंपाची थ्री फेज वीजमध्ये येणारी सिंगल फेज वीज सुमारे पाच महिन्यापासून बंद आहे. सहा गावांतील शेतकरी त्रस्त झाले आहेत. आज पाच महिने झालेत. शेतात व घरी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळी चोर्‍याचे प्रमाण वाढले आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचण होत आहे. या मागणीची दखल घेऊन दोन दिवसात वीज द्या, नाही, तर आम्ही अचानक कुठल्याही दिवशी ग्रामस्त, शेतकरी, महिला सहित मोठे आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी पाथर्डी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांना दिला. याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.
ग्रामीण भागातील वाडी,वस्तीवर वीज नाही.

शेतात रात्रीच्या वेळी जायचे म्हटल्यावर रानडुकरांची भीती असून, एका रानडुकराने चाऊन ग्रामस्थाला गंभीर जखमी केले आहे. रात्री चोरट्यांचा सुळसुळाट असून, लोकांना या भीतीपोटी रात्री जागे राहावे लागते. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी रात्री वीज नसते, या सर्व समस्येचा गांभीर्य लक्षात घेऊन वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

राजळे, अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक
वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे माजी सदस्य शिवशंकर राजळे व अधिकार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने राजळे यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला; मात्र यावर पडदा पडून आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button