नान्नज येथील बसस्थानकाचा प्रश्न सुटेना नागरिक आंदोलन छेडण्याच्या मार्गावर | पुढारी

नान्नज येथील बसस्थानकाचा प्रश्न सुटेना नागरिक आंदोलन छेडण्याच्या मार्गावर

नान्नज : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बसस्थानकाची गेल्या 20 ते 25 वर्षांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. बसस्थानक नसल्याने रस्त्यावर उभे राहूनच प्रवाशांना एसटी बसची वाट पाहावी लागत आहे. बसस्थानकाच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी वेळोवेळी आजी-माजी आमदारांकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नान्नजसह परिसरातील दहा ते पंधरा गावातील नागरिक आंदोलन छेडण्याच्या मार्गावर आहेत. नान्नज येथील बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. याबाबत वेळोवेळी बसस्थानकाच्या बांधकामासह स्वच्छतागृहाची मागणी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

बसस्थानक तिन्ही बाजूने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. ग्रामपंचायतीकडून संबंधित अतिक्रमणधारकांना तीन-चार वर्षांपूर्वी नोटिसा बजविण्यात आल्या. मात्र, पुढे काहीच कारवाई झाली नाही. जुन्या जागेवर बसस्थानकाचे बांधकाम न करता, इतर जागेवर बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. असे असताना तत्कालीन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जुन्या जागेवरच धुमधडाक्यात भूमिपूजन केले. मात्र, या घटनेला तीन ते चार वर्षे उलटूनही बसस्थानकाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे नान्नजसह दहा ते पंधरा गावातील नागरिक संतप्त झाले असून, कोणत्याही क्षणी आंदोलन छेडण्याच्या मार्गावर आहेत.

Back to top button