संगमनेर : पिकअपसह नदीत सापडला एकाचा मृतदेह | पुढारी

संगमनेर : पिकअपसह नदीत सापडला एकाचा मृतदेह

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : जोर्वे ते पिंपरणे दरम्यान प्रवरा नदीपुलावरून पडून पाण्यात वाहून गेलेल्या पिकअपसह चालकास शोधण्यात प्रशासनाला तब्बल 48 तासांनंतर यश आले. ठाणे येथून आलेल्या विशेष आपत्ती व्यवस्थापन पथकाने अवघ्या चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास नदीत वाहून गेलेला पिकअप क्रेनच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढली. मात्र, या वाहनात चालकासह अन्य एकाचा मृतदेह मिळणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात मात्र चालकाचाच मृतदेह आढळल्याने शेजारी बसलेला तिसरा पोहून पाण्याबाहेर गेला की, आणखी काही, या प्रश्नाने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक येथून प्रकाश किसन सदावर्ते, क्लीनर अमोल अरुण खंदारे व चुलते सुभाष आनंदराव खंदारे (रा. जालना) हे तिघे पिकअप वाहनात काचा घेवून संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील संदीप नागरे यांच्याकडे आले होते. काचा खाली करून तिघे वाहनातून जोर्वे-पिंपरणे प्रवरा नदीच्या पुलावरून संगमनेरकडे येत होते. यावेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप नदीचे कठडे तोडून नदीपात्रात कोसळली. दरम्यान, यावेळी अमोल खंदारे यांनी दरवाजातून उडी मारून जीव वाचवला. मात्र, किसन सदावर्ते व सुभाष खंदारे हे दोघे पिकअपसह वाहून गेले होते.

तालुका पो. नि. पांडुरंग पवार यांनी घटनास्थळावरुन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलिस उपाधीक्षक राहुल मदने व आपत्ती व्यवस्थापनाचे तालुकाप्रमुख तथा तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार उमाकांत कदम यांना माहिती देत शोधकार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन व क्रेनसह पट्टीच्या पोहणार्‍यांनी शोध घेतला. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या शोध लागला नव्हता.
स्थानिक प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत बुडालेल्या वाहनासह दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष आपत्ती व्यवस्थापनाची टीम पाठ विण्याची गरज आहे, अशी माहिती दिली.

ठाणे येथून विशेष आपत्ती व्यवस्थापन चमूतील सहा जणांचे पथक बुधवारी सायंकाळी 5 वाजता संगमनेरात दाखल होत पोकलेन यंत्राची मदत घेतली. चौघांनी पाण्यात बुड्या मारून पिकअप वाहन क्रेनच्या साह्याने ओढून काढले. मात्र, वाहनात एकट्या चालकाचा मृतदेह आढळल्याने अन्य एकाचा शोध घेण्याची प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

 

Back to top button